मुंबई : कोरोनाच्या या भयंकर साथीतून आपल्याला खूप शिकायला मिळाले. महाराष्ट्राने अगदी प्रारंभापासून कोरोनाविरुद्ध प्रखर लढा दिला आहे. या साथींच्या रोगात प्रतिकार शक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन मुंबईत रोगप्रतिकारशक्तीविषयक अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वैद्यक संशोधन परिषद ( ICMR) ने देशातील तीन ठिकाणी उच्च क्षमतेची अद्ययावत चाचणी सुविधा उभारली आहे. महाराष्ट्रात मुंबई येथे राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान ( NIRRH) तसेच कोलकाता आणि नोएडा अशी ही तीन ठिकाणे आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते या प्रयोगशाळांचे ऑनलाईन उद्घाटन झाले याप्रसंगी  मुख्यमंत्री  ठाकरे बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी प्रत्येक देशवासियाला कोरोनापासून वाचविणे हा आपला संकल्प असून इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाने वेळीच तातडीची पाऊले उचलल्याने कोरोनामुळे होणारे मोठ्या प्रमाणावर मृत्यू रोखल्याचे आणि १० लाख लोक बरे झाल्याचे सांगितले.



कोरोना लढ्यात ही आवश्यक सुविधा उपलब्ध केल्याबद्धल पंतप्रधानांना धन्यवाद देऊन मुख्यमंत्री म्हणाले, आज केवळ चाचणी, रुग्णांचे संपर्क शोधणे, आयसोलेशन अशा काही माध्यमांतूनच आपण लढतो आहोत. कोरोनावर उपचारासाठी निश्चित औषध आज तरी नाही, त्यामुळे सगळे विश्वच एक प्रयोगशाळा बनले आहे. महाराष्ट्र शासनाने मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमध्ये कोरोना विषयक जम्बो सुविधा उभारण्यास सुरुवात केली असून मुंबईत तर २० दिवसांमध्ये आम्ही या सुविधा उभ्या केल्या आहेत. ‘चेस दि व्हायरस’ परिणामकारकरित्या राबविल्याने चांगले परिणाम दिसत आहेत. कोरोनावर निश्चित औषधोपचार नसल्यामुळे राज्याने देशात सर्वात मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा थेरपीचा उपयोग सुरु केला. या  थेरपीचा उपचारांमध्ये परिणामकारक उपयोग दिसू लागला आहे.


मुंबईच्या परिसरात कायमस्वरूपी असे संसर्गजन्य  रोगांवरील उपचार करणारे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा मानस व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले, त्यामुळे येणाऱ्या अनेक जीवाणू आणि विषाणूजन्य रोगांचा ठामपणे मुकाबला करता येईल. तसेच केंद्र सरकारने सप्टेंबरच्या पुढेदेखील राज्यांना पीपीई किट्स आणि एन ९५ मास्कचा पुरवठा करावा अशी विनंती करून मुख्यमंत्र्यांनी राज्यात जिल्ह्यांमध्ये डॉक्टर्सचे टास्क फोर्स आणि गावोगावी ग्राम दक्षता समित्या स्थापन करून कोरोना विषयक जनजागृती करीत आहोत असे सांगितले. मार्चमध्ये राज्यात दोन प्रयोगशाळा होत्या. त्या आता १३० पर्यंत गेल्या आहेत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी इतर उपाययोजनांची देखील माहिती यावेळी दिली.  


राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. राज्यात २६६५ कोविड समर्पित आरोग्य केंद्रे आणि रुग्णालय आहेत. एकूण ३ लाख ६ हजार १८० आयसोलेशन बेड्स. ऑक्सिजन बेड्स ४२ हजार ८१३, आयसीयू बेड्स ११ हजार ८८२,  ३७४४ व्हेंटीलेटर्स, ७ लाख ६ हजार ९११ पीपीई किट्स, १२ लाख ५९ हजार ३८२ एन ९५ मास्क अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.