मुंबई : घाटकोपर स्थानकातील गर्दीवर उपाययोजना म्हणून मेट्रो स्थानकातील उपनगरीय रेल्वेचे तिकीटघर आणि स्टेशन मास्तर कार्यालयाची जागा बदलण्यात येणार आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकात प्रवाशांना मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या गर्दीवर उपाय शोधण्याची मागणी खासदार मनोज कोटक यांनी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानुसार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी, गेल्याच आठवड्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी काय उपाययोजना राबविता येतील याचा सविस्तर आराखडा तयार करुन ३० दिवसांच्या आत रेल्वेमंत्राकडे पाठविण्याचे आदेश दिले होते. 


तसेच गेल्या शुक्रवारी रेल्वे, मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खा.मनोज कोटक यांच्यासोबत घाटकोपर स्थानकाची पाहणी देखील केली. त्यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी छोटे, मध्यम आणि मोठ्या कालावाधीचे प्लॅन तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. 


आखण्यात आलेल्या आराखड्यानुसार, घाटकोपर स्थानकातील मुख्य पादचारी पुलावरील ऑटोमॅटिक तिकिट यंत्रांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सध्या सात यंत्रे असून त्याची संख्या ११ करण्यात येणार आहे. सुरक्षा गेट आणि सामानाची तपासणी करणाऱ्या स्कॅनिंग मशिन्सची संख्या देखील वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे सामान तपासण्याचे काम लवकर होण्यास मदत होईल. 


याशिवाय रेल्वेचे तिकिट काउंटर देखील तेथून हलवून दुसऱ्या जागी बसविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना जादा रिकामी जागा उपलब्ध होईल असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.


याशिवाय मेट्रोच्या आवारातील रेल्वेचे तिकिटघर काढण्याची तयारी सुरू असून, मेट्रो परिसरातील काही किरकोळ दुकान, मेट्रोचे स्टेशन मास्तर कार्यालय काढून प्रवाशांच्या गर्दीसाठी जागा शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.