कोविड सेंटरचा वाद? किरीट सोमय्यांच्या आरोपांवर महापौरांनी दिलं आव्हान
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना टार्गेट केलं आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंपनी स्थापन करुन किश कंपनी सर्व्हिस लिमिटेड या कंपनीला वरळीत डोम इथं कोव्हिड सेंटरचं काम दिलं, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
महापौरांनी स्वत:च्या कंपनीला काम दिलं, लोकांना भीती दाखवत पैसे कमवले असा आरोप करत सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी कोणतंही टेंडर न काढता महापौर यांच्या कंपनीला काम दिलं, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केली आहे.
कोव्हिड टेंडर स्पेशल फॉरेन्सिक ऑडिट केलं जावं, मुंबई मनपा आयुक्तांनी यावर उत्तर द्यावं अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. पुढील काळात यासंदर्भात अजून गंभीर कागदपत्र आरटीआयअंतर्गत काढू असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.
दरम्या किरिट सोमय्या यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. बोगस शेल कंपन्या स्थापन करुन यशवंत जाधव आणि कुटुंबियांनी जास्त दराने शेअर खरेदी केल्याचं उघड होत आहे, अनिल देशमुख यांनी हीच सिस्टिम वापरत काम केलं असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किशोरी पेडणेकर यांचं उत्तर
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे. किरीट सोमय्या यांना बोलण्यासाठीच ठेवलं आहे. आमची अब्रूही अशी तकलादू नाहीय, की ठेवलेल्या माणसाने बोलावं अशा कडक शब्दात किशोरी पेडणेकर यांनी सोमय्या यांना उत्तर दिलं आहे. तसंच किरीट सोमय्या हे तमाशातील गांजाडिया आहेत, असा आरोपही किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि यशवंत जाधव यांच्यावर सोमय्या विनाकारण टीका करत आहेत, निवडणुका आल्या की गांजाडिया बाहेर येतात, असं म्हणत आरोप सिद्ध करा असं आव्हान किशोरी पेडणेकर यांनी सोमय्या यांना दिलं आहे.