पालघरमधील घटना अमानवीय, पोलिसांवर कारवाई करा- फडणवीस
महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मुंबई: पालघरमध्ये दरोडेखोर समजून तीन व्यक्तींची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. ही घटना अतिश्य गंभीर आणि अमानवीय आहे. या घटनेवेळी जमाव पोलिसांसमोर त्या लोकांना लाठ्याकाठ्यांनी मारत होता. मात्र, पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे राज्य सरकारने पोलीस आणि दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देश एका गंभीर परिस्थितीला सामोरा जात असताना तर हा प्रकार आणखी व्यथित करणारा आहे. यामुळे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच पोलीस कोणाच्या दबावाखाली आहेत का, अशी शंका घेण्यासही वाव आहे. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा करावी, असेही फडणवीस यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्याच्या काही भागात सध्या चोर, दरोडेखोर फिरत असल्याच्या अफवांना उधाण आले आहे. चोर माणसांनाचही पळवून नेतात आणि किडणी काढून विकतात अशा अनेक अफवा परिसरात पसरल्या आहेत. या अफवांवर विश्वास ठेवून लोक रात्रीची गस्त घालत आहेत. गुरुवारी रात्री अशाच गैरसमजातून जमावाने तिघांचा जीव घेतला. धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यांनी पोलिसांवरही हल्ला केला आणि पोलिसांच्या गाडीतच तिघांना दगड, बॅट आणि बांबूने ठेचून तिघांची हत्या केली.
हत्या झालेले तिघेजण कांदिवली येथे राहणारे होते. तिघेही मयत हे त्रंबकेश्वरचे दक्षिणमुखी आखाड्याशी संबंधित आहेत. हे तिघे दादरा नगर हवेलीकडे जायला निघाले होते. खरे तर लॉकडाऊन असल्याने रात्री आडरस्त्याने जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. रात्री साडेदहा-अकरा वाजण्याच्या दरम्यान या गावात गस्त घालणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांची गाडी अडवली आणि हटकले. दरोडेखोर असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी या तिघांना जबर मारहाण केली.