दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील लाखो मजूर आपापल्या राज्यात परतले आहेत. त्यामुळे भूमीपुत्रांना महाराष्ट्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. या संधी मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कामगार ब्यूरोची स्थापना करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हायवेवरून रोज लाखो मजूर मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी पायी आपल्या राज्यात परतत आहे. राज्याच्या अनेक सीमांवर सध्या परप्रांतीय मजूरांचे जथ्थेच्या जथ्थे दिसत आहेत. राज्यातील लाखो कामगार, मजूरांनी कोरोनाचे संकट आल्याने राज्यातील अनेक शहरांमधून आणि जिल्ह्यांमधून आपला संसार गुंडाळून आपलं गाव गाठलंय. यामुळे इथल्या उद्योगांसमोर एक नवं संकट उभं राहिलंय. आता इथल्या उद्योगांना मजूर आणि कामगारांची कमतरता जाणवणार आहे. खरं तर उद्योगांसमोर कोरोनामुळे उभी राहिलेली ही अडचण राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची संधी घेऊन आली आहे. भूमिपुत्रांना या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कामगार ब्यूरोची स्थापना करणार आहे.


राज्यातील उद्योग, कामगार आणि कौशल्य विकास विभागातर्फे या कामगार ब्यूरोची स्थापना केली जाणार आहे. या कामगार ब्यूूरोकडे नोंदणी करणाऱ्या कामगारांची कुशल, अकुशल तसंच कौशल्याप्रमाणे विभागणी केली जाईल. यानंतर कामगारांना प्रशिक्षण दिले जाईल आणि उद्योगांच्या गरजेनुसार नोंदणी केलेल्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल.


संकटात अनेकदा संधी चालून येते. राज्यातील परप्रांतीय कामगार राज्यातून निघून गेल्याने कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात लाखो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. भूमीपुत्रांनी या नोकऱ्यांचा लाभ घ्यावा यासाठी सरकारही पुढे सरसावलंं आहे. आता इथल्या मराठी तरुणांनीही एक पाऊल पुढे टाकून या नोकऱ्यांमध्ये संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.