मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्याने उद्धव ठाकरे यांच्यापुढचं आव्हान वाढलं आहे. अंधेरी विधानसभा पोट-निवडणुकीसाठी त्यांना शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये. त्यामुळे ठाकरे गटाला दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगापुढे तीन चिन्ह आणि तीन नावांचा प्रस्ताव पाठवला आहे. उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे शिंदे गटाची देखील वर्षा बंगल्यावर आज बैठक झाली. या बैठकीत देखील शिंदे गटाने नवीन चिन्ह आणि नावाबाबत चर्चा केली. निवडणूक चिन्हाबाबत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गट त्यांनी दिलेला पर्याय जाहीर करणार आहेत. उद्या निवडणूक आयोगाकडे चिन्हा संदर्भात शिंदे गट मागणी करणार आहे. यावेळी सर्व निर्णय एकनाथ शिंदे यांनी घ्यावेत असे अधिकार उपस्थित आमदार आणि खासदारांनी दिले आहेत.


एकनाथ शिंदे गटाकडून उगवता सूर्य, तुतारी, तलवार आणि गदा यापैकी एका चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे. तर याआधी शिंदे गटाकडून देखील उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ या पैकी एका चिन्हाची मागणी करण्यात आली आहे.


निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार याकडे दोन्ही गटाचे लक्ष लागून आहे. या बैठकीत अंधेरी पोटनिवडणूक लढवण्यावरही चर्चा झाल्याचं समजतंय. शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री बैठकीला उपस्थित होते.


शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच शिंदे गटावर आणि भाजपवर घणाघाती टीका केली. माझ्या आजोबांनी दिलेलं शिवसेना हे नाव आणि बाळासाहेब ठाकरेंनी जपलेलं धनुष्यबाण हे चिन्ह 40 डोक्यांच्या रावणानं गोठवलं. चिन्हं आणि नाव गोठल्यानं महाशक्तीला उकळ्या फुटल्यात, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला.