मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे आणि पवारांची तिसरी पिढी सक्रीय झाली आहे. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे दोघेही विधानसभेच्या ऱणसंग्रामात उतरायला सज्ज झाले आहेत. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर रोहित पवार नगरमधल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून रणसंग्रामात उतरत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन आहिर शिवसेनेत आल्यावर आदित्य ठाकरेंसाठी वरळी मतदारसंघ सुरक्षित झाला आहे. विरोधकांनाही मॅनेज करुन आदित्य ठाकरेंची लढत सोपी व्हावी, अशी नेपथ्यरचना शिवसेनेनं केली आहे. 


दुसरीकडे रोहित पवारांचा मुकाबला मात्र भाजपचे हेवीवेट नेते आणि मंत्री राम शिंदे यांच्याशी होणार आहे. रोहित पवार यांच्यासाठी लढत सोपी नाही, पार्थ पवार यांचा लोकसभेतला पराभव समोर असतानाही मोठ्या हिमतीनं रोहित मैदानात उतरले आहेत.


आदित्य ठाकरे 


आदित्य ठाकरे हे बीएएलएलबी आहेत, खेळ, कला आणि कविता हा आदित्य ठाकरे यांचा छंद आहे. सध्या ते ठाकरे घराण्याचा वारसा चालवत आहेत. सुसंस्कृत आणि आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे. तर तरुणाईमध्ये देखील आदित्य यांची क्रेझ पाहायला मिळते. शहरी भागातल्या प्रश्नांचा अभ्यास त्यांच्या बोलण्यातून दिसतो. सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीचा फायदा या आदित्य ठाकरेंच्या जमेच्या बाजू आहेत. 


आदित्य ठाकरेंचं जे बलस्थान आहे, तीच कमकुवत बाजू देखील आहे. त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो. ग्रामीण प्रश्नांचा फारसा अभ्यास नाही. उत्तम वक्तृत्वशैलीचा अभाव, अवतीभोवती नेत्यांच्याच मुलांचं कोंडाळं, या आदित्य ठाकरेंच्या काही कमकुवत बाजू दिसतात. 


रोहित पवार


रोहित पवार बॅचलर ऑफ मॅनेजमेंट आहेत. बारामती अॅग्रोचे सीईओपदाची जबाबदारी ते सांभाळतात. रोहित पवार हे शरद पवारांचे नातू आहेत. अभ्यासू आणि आश्वासक चेहरा अशी त्यांची ओळख. २ वर्षांपासून मतदारसंघात चांगली बांधणी त्यांनी केली आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात ते देखील हुशार आहेत.


पण रोहित पवारांवरही घराणेशाहीचा आरोप होतो. बाहेरचा उमेदवार अशी प्रतिमा त्य़ांची तयार झाली. या रोहित पवार यांच्या काही कमकुवत बाजू आहेत. 


२००९ साली पंकजा मुंडे, समीर आणि पंकज भुजबळ, अमित देशमुख, निलेश राणे आणि प्रणिती शिंदे ही नव्या दमाची नवी पिढी विधानसभेच्या रणसंग्रामात उतरली होती. आता आदित्य, रोहित आणि सुजय हे तीन नव्या दमाचे शिलेदार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आता कोण-कोण बाजी मारेल आणि कोणाला जनता स्वीकारेल हे निवडणूक निकालानंतरच कळेल.