महिन्याचा नाही तर तीन / सहा महिन्यांचा एसी लोकलचा पास
वातानुकूलित लोकल गाडीला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर पश्चिम विभागीय रेल्वेकडून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
मुंबई : यापुढे पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या पास काढण्यासाठी प्रत्येक महिन्याला तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागणार नाही. कारण, आता या एसी लोकलसाठी तुम्हाला तीन किंवा सहा महिन्यांचा पास एकदाच काढता येणार आहे... तसा प्रस्ताव पश्चिम रेल्वेनं दिलाय. पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते चर्चगेट मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित लोकल गाडीसाठी आता तीन आणि सहा महिन्यांचा पासही प्रवाशांना देण्यात येणार आहे. सध्या या वातानुकूलित लोकलसाठी एकाच महिन्याचा पास या लोकल गाडीसाठी आहे. वातानुकूलित लोकल गाडीला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर पश्चिम विभागीय रेल्वेकडून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
२५ डिसेंबर २०१७ रोजी पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते चर्चगेट अशी वातानुकूलित लोकल पहिल्यांदा धावली. जानेवारी २०१८ पासून विरापर्यंत लोकल फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला. जादा भाडे पाहता या गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळेल की नाही, अशी शंका रेल्वेला होती. मात्र, उकाडा वाढताच वातानुकूलित लोकल गाडीला प्रतिसाद वाढत गेला... तर वातानुकूलित रेल्वेतून चर्चगेट ते विरार या एकेरी प्रवासासाठी २०५ रुपये तिकिटदर आहे तर एका महिन्याच्या पाससाठी २०४० रुपये आकारण्यात येतात.
लोकल सेवेत आल्यानंतर आतापर्यंत १७ हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी एक महिन्याचा पास, तर ८२ हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी तिकीट काढलेले आहे. प्रवाशांनी पासालाही दिलेल्या पसंतीमुळे पश्चिम रेल्वेने तीन आणि सहा महिन्यांचा पासही प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. याचा प्रस्ताव पश्चिम विभागीय रेल्वेकडून तयार करून चर्चगेट येथील रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर तो रेल्वे बोर्डाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.