मुंबई : देशात, महाराष्ट्रात राजकीय वातावरणात एक मळभ पसरलंय. या वातावरणावर आलेलं मळभ, दुःख, गढूळपणा आजच्या सभेने दूर होईल. महाराष्ट्राचा आकाश निरभ्र होईल आणि या आकाशात भगवा धनुष्य दिसेल. ज्यांना पोटदुखीची जळजळ आहे त्यांच्यावर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील, असा टोला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या कुणाला काही प्रश्न पडले असतील, त्यांचे शंका समाधान झाले नसेल त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल अशा प्रकारची ही सभा असणार आहे. आम्हाला गर्दी जमा करावी लागत नाही. आम्हाला गर्दी आणावी लागत नाही. त्यामुळे आजची मुंबईतली सभा ही आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप असेल असे राऊत म्हणाले.


या देशात केवळ एकच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackarey ) होते आणि तेच राहणार आहेत. बाकी हिंदू जननायक कोण, महानायक कोण हे प्रश्न या देशात उपस्थित होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे त्यांनी सांगितले. 


काँग्रेस चिंतन सभा


काँग्रेस सध्या चिंतन सभा घेत आहे. ही त्यांची भूमिका चांगली आहे. काँग्रेस पक्षाने हालचाल करून हळूहळू वर यायला पाहिजे. त्यामुळे देशात परिवर्तनाची आशा निर्माण होईल असे ते म्हणाले. 


केतकी शूद्र कीटक.. 


काही व्यक्ती या हिमालयाएवढ्या असतात. सूर्यावर थुंकले म्हणून सूर्याचे महत्व कमी होत नाही. ही नशेबाज लोक आहेत यांना एक वेगळ्या प्रकारची नशा चढली आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी असे शूद्र कीटक वावरत असतात आणि खिडकी उघडली की ते हवेबरोबर उडून जातात असा टोला त्यांनी केतकी चितळेला लगावला.