मुंबई : मुंबई दरवर्षीच पाण्यात बुडते असा तुमचा आमचा अनुभव आहे. पूर ही नैसर्गिक आपत्ती आहे असं सांगून सत्ताधारीही हातावर हात ठेऊन बसतात. पाऊस बरसणार आणि मुंबईची तुंबणार हे जणू काही मुंबईकरांनी गृहितच धरलंय. मुंबई तुंबण्याची समस्या निसर्गनिर्मित नाही. नियोजनशून्य कारभारामुळं मुंबई तुंबते हे सत्ताधारी मानत नसले तरी ही वस्तूस्थिती आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून राजकारणी मुंबई तुंबण्याच्या समस्येपासून स्वतःची सुटका करून घेतात. दुसरीकडं जपानमधील टोकिओ हे एक असं शहर आहे ज्या शहरानं पुरावर विजय मिळवलाय. टोकिओ शहरातील उत्तरेकडील भाग आणि उपनगरांमध्ये काही वर्षांपूर्वी सतत पूर यायचे. यंत्रणा उभारण्याआधी थोडा पाऊस पडला तरी नदीला पूर यायचा... पुराच्या पाण्यानं हा सगळा भाग भरून जायचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूरस्थितीवर कायमस्वरुपी उपाय म्हणून टोकिओ शहराखाली पन्नास मीटर खोलवर पूरनियंत्रक यंत्रणा तयार करण्यात आली. टोकिओ शहराखाली पाच अतिविशाल बोगदे खोदण्यात आले. यातला एक बोगदा ७८ मीटर रूंद आणि ८० मीटर उंच आहे. हा एक बोगदा एवढा उंच आहे की यात अमेरिकेतल्या स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा सहज मावू शकेल. या यंत्रणेची एकूण लांबी ६ किलोमीटर एवढी आहे.



जेव्हा टोकिओ शहरात पूरस्थिती निर्माण होते. तेव्हा पुराचं पाणी नदीजवळच्या या बोगद्यांमध्ये सोडलं जातं. त्यामुळं पुराचं पाणी नदीपात्राबाहेर येत नाही. १९९० पासून ही यंत्रणा जवळपास शंभर वेळा वापरण्यात आली. याचा सकारात्मक परिणाम असा की १९९० पासून टोकिओ शहरात फारच अपवादात्मक स्थितीत पाणी तुंबलं.


पूरनियंत्रण यंत्रणा बसवण्याअगोदर आणि नंतरच्या परिस्थितीची तुलना केली असता जवळपास ९० टक्क्यांपर्यंतचे पूर नियंत्रणात आणले गेले. टोकिओतले पूर नियंत्रणात आणण्यात या यंत्रणेचा मोठा वाटा आहे.


निसर्गाला दोष देऊन हातावर हात ठेऊन बसणं हे जपानी माणसाला मान्य नाही. त्यामुळंच टोकिओसारख्या गजबजलेल्या शहराला त्यांनी पूरमुक्त केलं. मुंबईचे राज्यकर्ते मुंबईला पूरमुक्त करतील का? मुंबईच्या राज्यकर्त्यांमध्ये ती इच्छाशक्ती आहे का? असा सवाल मुंबईकरांमधून विचारला जातोय.