मुंबई : टोलच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आणि मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंसोबत (Raj Thackeray) गुरुवारी संध्याकाळी बैठक घेतली. राज यांच्या मागणीनुसार शुक्रवारी सकाळी रस्ते विकास मंडळाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) राज यांच्या निवासस्थानी दाखल झाले. टोलनाक्यांसंबंधी (Toll Booth) पंधरा दिवसांचा रोडप्लॅनच या बैठकीत ठरला आणि त्यावर तातडीनं कार्यवाही सुरु झाली. मात्र एक मंत्री राज ठाकरेंच्या घरी जातो, एका विषयावर चर्चा करतो, सरकार तातडीनं कामाला लागतं.. यावरुन विरोधकांनी टोलेबाजी केलीय.. मंत्री घरी जाऊन चर्चा करतो ही नवीन पद्धत असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय तर राज ठाकरेंच्या घरी मंत्री का जातात असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोलमुक्तीबाबत राज ठाकरेंच्या घरी झालेल्या बैठकीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. मुख्यमत्र्यांनी राज ठाकरेंच्या घरी मंत्री पाठवून टोलबाबत निर्णय घेणे म्हणजे टोलचा झोल किती मोठा आहे असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Waddettiwar) केलाय. तर मंत्र्यानं कुणाकडे जाऊन चर्चा करणं ही राज्यात नवी पद्धत रुजल्याचा टोला शरद पवारांनी (Sharad Pawar) लगावलाय. राज्यातील टोल प्रश्नावर मनसेने आंदोलन करताच सरकार राज ठाकरेंच्या घरी जाते हे घटनाबाह्य आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राज ठाकरे यांच्या घरी सरकार जाते म्हणजे हे समांतर सरकार चालवल्यासारखे आहे. विरोधी पक्षाने जनतेचा एखादा मुद्दा सरकारकडे मांडला तर त्यावर सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचा असतो कोणाच्या घरी मंत्री किंवा अधिकारी पाठवून नाही, अशी टीका काँग्रेसने केलीय.


राज ठाकरे-राज्य सरकारमध्ये पडद्यामागे काही शिजतंय का याकडेच विरोधकांचा रोख आहे. खरंच राज ठाकरेंना जाणीवपूर्वक बळ दिलं जातंय का असे सवाल त्यामुळे उपस्थित होतायत..


मनसेला बळ कुणाचं? विरोधकांची शंका
राज यांच्या आंदोलनाची तातडीनं दखल घेतली गेली, अशी दखल राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाची घेतली जात नाही. टोलच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंना जाणीवपूर्वक ताकद दिली जातेय. मनसेला मुंबई, ठाण्यात ताकद मिळेल यादृष्टीने पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री शिंदेंचा मुंबईत प्रभाव नाही, उलट ठाकरे गटाचा जनाधार मुंबईत भक्कम आहे. त्यामुळे मुंबईत मनसेला जितकी ताकद मिळेल तितका ठाकरे गटाला तोटा होईल असा तर्क मांडला जातोय


टोलचा मुद्दा सामान्यांना भिडणारा आहे. त्यामुळे टोलविरोधात राज यांना ताकद मिळाली तर त्याचा तोटा ठाकरे गटाला होईल आणि फायदा भाजप-शिंदे गटाला होईल.. असा आरोप विरोधकांकडून होतोय. त्यामुळेच राज यांच्यासाठी शासन आपल्या दारी अशी टीका विरोधक करतायत.