मुंबई : काहीशा विचित्र पण गंभीर चोराच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलीसांना यश आले आहे. पोलिसांनी चक्क एका टोमॅटो चोराला सखोल तपास करून अटक केले आहे. चंद्रशेखर राधेश्याम गुप्ता (वय 54) असे आरोपीचे नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुप्ता याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत आपल्या गुन्ह्याची कबूली दिली आहे. गुप्ता याने चक्क ९०० किलो टोमॅटोची चोरी केली होती. पोलिसांनी या प्रकरणी २८ दिवस तपास केला. त्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी केलेल्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती पूढे आली. गुप्ता याने  २०१५ केळी चोरीही केली होती. केळीचे ६० क्रेट्स चोरल्याचे गुप्ताने पोलिसांना सांगितले. त्यावेळी त्याला अटकही झाली होती. मात्र, पूढे तो जामीनावर सुटला.


दरम्यान, श्रीवास्तव नावाच्या टोमॅटो विक्रेत्याने १८ जुलै रोजी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा तपास सुरू केला होता. श्रीवास्तव याने दहिसर स्थानकाजवळील अविनाश कम्पाऊंडमधील भाजी बाजारातून ५७ हजार रुपये किंमतीचे टोमॅटोचे क्रेट्स खरेदी केले होते. दरम्यान, आपल्या दुकानाजवळ टोमॅटो ठेऊन तो घरी गेला. परत येऊन पाहिले असता टोमॅटो गायब होते. त्यामुळे त्याने पोलीसात तक्रार दिली होती.


टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले


दरम्यान, ही चोरी झाली तेव्हा टोमॅटोचा भाव गगनाला भिडले होते. टोमॅटो चक्क १०० ते १२० प्रतिकिलो दराने विकले जात होते.प्रत्यक्षात ९०० किलो टोमॅटो चोरीला गेले होते. मात्र, पोलिसांनी ३०० किलो टोमॅटोच चोरीला गेल्याची नोंद केल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.


विचित्र प्रकारची तक्रार आल्यामुळे पोलीसांच्या भूवया उंचावल्या. त्यांनी तपासयंत्रणा कामाला लावली. पण, घटनास्थळावर सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने तसेच, पहाटेची वेळ असल्याने कोणी साक्षीदारही नसल्याने पोलीसांसमोर आव्हान होते. दरम्यान, पोलीसांना घटनास्थळाजवळून काही अंतरावर असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ‘साई टेम्पो सर्व्हिस’असे लिहीलेला एक संशयास्पद टेम्पो दिसला. पोलीसांनी या टेम्पोचा शोध घेतला आणि चोर सापडला. या प्रकरणात टेम्पोचा मालक गुप्ता यालाही पोलीसांनी बेड्या ठोकल्या.