कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईकरांना २०२० या नवीन वर्षात मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. दक्षिण मुंबईतले ११ पूल पाडून त्यांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास प्रवाशांना करावा लागणार आहे. मुंबईतला हँकॉक पूल. ४ वर्षं झाली तरी अजूनही कामाला सुरूवातच झालेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोअर परळ पूल...वर्ष होत आलं तरी कामात प्रगती नाही. अशाताच नव्या वर्षात दक्षिण मुंबईतील रेल्वे लाईनवरचे ११ पूल आणि रेल्वे लाईनखालील एका भुयारी वाहतूक मार्गाचीही पुनर्बांधणी केली जाणार आहे. 


मागच्या अनुभवातून धडा घेत मुंबई महानगरपालिका आता नव्या पुलांचं काम महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्टक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला देणार आहे. त्यासाठीचा खर्च मात्र मुंबई महानगरपालिका करणार आहे. 



करी रोड, रे रोड, भायखळा रेल्वे पूल, भायखळ्याचा एस ब्रिज, घाटकोपर रेल्वे पूल, बेलासिस रेल्वे पूल, महालक्ष्मी पूल, दादरचा टिळक पूल, एल्फिन्स्टन पूल या सर्व रेल्वे लाईनवरच्या पुलांची, तसंच माटुंगा लेबर कँम्पजवळील रेल्वे लाईनखालच्या वाहतूक भुयारी मार्गाचीही पुनर्बांधणी केली जाणार आहे.  


या पुलांचं काम टप्प्याटप्याने हाती घेतलं जाणार असल्याचे सांगितलं जातंय. मात्र पुलांच्या पुनर्बांधणीला दिर्घ कालावधी लागणार असल्यानं रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांची मोठी दमछाक होणार आहे. 


अगोदरच मेट्रो ३ च्या कामामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी होत असतानाच आता या पुलांच्या कामांमुळे या वाहतूक कोंडीत आणखीनच वाढ होणार आहे.