मेघा कुचिक / मुंबई : एका तरुणाला रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गालाचा मुका घेणे चांगलेच महागात पडले आहे. तब्बल 7 वर्षांनी आरोपीला जेलची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलाच्या गालाचा मुका एका तरुणांने सात वर्षांपूर्वी घेतला होता. तब्बल सात वर्षांनी आरोपीला मुंबईतील मेट्रोपोलिटीन मॅजिस्ट्रेट न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. आरोपीचे नाव किरण सुझा होनावर असून, तो गोव्यातील पणजी येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


काय आहे हे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई लोकलमधून प्रवास करताना एका तरुणाने सहप्रवासी महिलेच्या गालाचा मुका घेतला होता. तब्बल सात वर्ष हा खटला न्यायालयात सुरु होता. सर्व साक्षीदारांची तपासणी झाल्यानंतर महानगर दंडाधिकारी व्ही. पी. केदार यांनी आरोपीस 1 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट 2015 रोजी एक महिला प्रवासी आपल्या मित्रांसोबत हार्बर मार्गावरील गोवंडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन असा प्रवास करत होती. लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 1 वर आली असता, किरण सुझा होनावर (37) याने त्या महिला प्रवासीच्या उजव्या गालाचा मुका घेवून लज्जा उत्पन्न करुन विनयभंग केला होता. त्यानंतर, पीडित महिलेने याबाबत सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार दाखल केली होती. लोहमार्ग पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब नोंदवून आरोपी विरोधात कलम 354, 354 (अ) (1) नुसार गुन्हा नोंदविला होता. 


तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक गणपत गोंदके यांनी संबंधित आरोपीस अटक करुन पुढील तपास सुरु केला. तपासादरम्यान त्यांनी अटक आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त साक्षीदार तसेच सबळ पुरावे संकलित करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यानंतर त्याला न्यायायलाने ही शिक्षा ठोठावली.


यांची भूमिका महत्वाची ठरली



या खटल्यामध्ये सरकारपक्षाच्यावतीने अभियोक्ता कदौर यु. शेख यांनी कामकाज पाहिले. तसेच खटल्याच्या सुनावणीच्या कामकाजात रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब इनामदार यांचे मार्गदर्शन आणि सुचनांप्रमाणे समन्स तसेच वॉरंटचे कामकाज पाहणारे पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक पुरुषोत्तम गावडे तसेच कोर्ट अंमलदार पोलीस नाईक, पांडुरंग जंगम यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.


खटल्याच्या माध्यमातून हा स्पष्ट संदेश


वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब इनामदार यांनी सांगितले, यापुढे विनयभंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची कायद्यानुसार गय केली जाणार नाही, असा संदेश या खटल्याच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. महिलांचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यामार्फत यापुढे महिला संदर्भात गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून कोणाचीही गय केली जाणार नाही असेही ते म्हणाले.