भाईंदरच्या मुलीने जर्मनीत लग्न केलं, माहेर दाखवण्यासाठी 24 हजार किमी बाईकने प्रवास करत भारत गाठलं
24 हजार किलोमीटर, 155 दिवस आणि 18 देश पारत करत भाईंदरची नवरी आणि जर्मनीचा नवरा भारतात पोहोचले, अविस्मरणीय ट्रीप
प्रथमेश तावडे, झी मीडिया, भाईंदर : प्रेम आंधळं असतं, प्रेमाला जाती-पातीचा, धर्माचा इतकंच काय तर देशांचीही मर्यादा नसते. याचं जगासमोर आदर्श ठेवणारं एक उदाहरण समोर आलं आहे. भाईंदरची मुलगी जर्मनीत प्रेमात पडली आणि तिथेच तीने लग्नही केलं. आपल्या पतीला भारतात माहेर दाखवण्यासाठी भाईंदरमध्ये आणलं. पण ते विमान किंवा समुद्रमार्गे आले नाहीत. तर भाईंदरच्या या मुलीने आपल्या जर्मन पतीसह चक्क रस्ते मार्गे बाईकने प्रवास करत भारत गाठलं. या जोडप्याने जर्मनी ते भाईंदर असा एकूण 24000 किलोमिटरचा प्रवास 155 दिवसांत पूर्ण केला आहे. पत्नीवरच्या प्रेमासाठी जर्मन पतीनेही तिची इच्छा पूर्ण केली.
भाईंदरच्या जैसल पार्कमध्ये रहाणारी मेधा राय ही गेल्या सात वर्षांपासून जर्मनीत राहते. इथेच तिची ओळख हॉकशी झाली. मैत्रीचं रुपांत प्रेमात झालं आणि त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जर्मनीतच त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. कोरोना काळामुळे लग्नावेळी मेधाचे कुटुंबीय जर्मनीत उपस्थित राहू न शकल्याने या दोघांनी त्यांना भेटण्यासाठी बाईकने भारतात जायचे ठरवलं. या जोडप्याने 24 हजार किलोमीटरचा प्रवास करत दोघांनी भाईंदर गाठले आहे.
दोघेही दोन बाईकने प्रवास करत भाईंदर मध्ये आल्यानंतर मेघाचं कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी आपल्या भारतीय संस्कृती नुसार औक्षण करून या दोघांचे स्वागत केले आहे. मेधाने आपल्या प्रवासाबद्दल सांगताना, म्हणते जर्मनीहून येताना तिला 18 देश लागले.. प्रत्येक देशात तिला लोकांनी प्रेम दिलं. विशेषत: पाकिस्तान आणि इराणमध्ये त्यांना खूप प्रेम मिळाले असं मेधाने सांगितलं.
मेधा आणि तिचा पती हॉक यांना सर्वात चांगलात अनुभव पाकिस्तानात आल्याचं तीने सांगितलं. पाकिस्तानी नागरिकांनी खूप प्रेमाने आणि आदराने तिचं स्वागत केलं. पाकिस्तानी नागरिकांना जेव्हा कळालं की भारतातून आले आहेत, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. पाकिस्तानातील नागरिकांनी मला अनेकदा चहा पिण्याचा आग्रह केला, ते म्हणाले की तुम्ही चहा न पिता गेलात तर आम्हाला वाईट वाटेल..तुम्ही भारता मध्ये जाऊन असं नको म्हणायला की पाकिस्तान मधील नागरिकांनी भारतीयांना चहा पण नाही विचारला असा अनुभव मेधाने सांगितला.
खरंतरस बाईक प्रेमी असलेल्या या मेधा आणि तिच्या पतीने 18 देशांचा प्रवास करत भारतात येऊन एक विक्रम केला आहे. तिच्या या प्रवासाची बातमी लोकांपर्यंत जशी पोहोचतेय तश्या साऱ्यांच्याच भुवया उंचावत आहेत.