मुंबई : टीआरपी घोटाळा (TRP scam) प्रकरणात ईडीने (ED) आर्थिक गैरव्यवहार आणि पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी केस दाखल केली आहे. विशेष म्हणजे सध्या टीआरपी प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस (Mumbai police) करत आहेत. त्यात आता ईडीनेही केस दाखल केल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ईडीला तपासात सहकार्य करू असे म्हटले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना तपासापूर्वी राज्याची परवानगी घ्यावी लागेल याची आठवण त्यांनी करून दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कोणत्याही राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांना तपासापूर्वी त्या राज्याची परवानगी घ्यावी लागेल, याचे सर्वोच्च न्यायालयाने स्वागत केले आहे, असे देशमुख म्हणाले. टीआरपीबाबत मुंबई पोलीस चांगला तपास करत आहेत. मात्र त्यातल्या पैशांच्या गैरव्यवहारांचा तपास ईडी करणार आहे, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये दाखल केलेल्या एफआयआरचा अभ्यास केल्यावर ही केस ईडीने दाखल केली आहे. 



मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत तिन्ही चॅनेल्सच्या काही कर्मचाऱ्यांसह हंस रिसर्च एजन्सीच्या काही माजी कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. या सर्वांना ईडी चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती मिळत आहे. खोटा टीआरपी निर्माण केला गेला का आणि त्यातून मिळालेला पैसा बेनामी संपत्ती गोळा करण्यासाठी वापरला गेला का याचा तपास ईडी करणार आहे.