भाजपला समर्थन देणारे दोन अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात
भाजपच्या गोटात गेलेले दोन अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात.
मुंबई : भाजपच्या गोटात गेलेले दोन अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहे. दरम्यान, या दोन आमदारांची नावे समजू शकलेली नाहीत. मात्र, त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट मागितली आहे. सध्याच्या राजकीय हालचाली बघता उद्धव यांना वेळ नाही. त्यामुळे त्या दोन अपक्ष आमदारांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.
शिवसेनेला आठ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. आता आणखी दोन अपक्ष आमदार शिवसेनेसोबत येण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढण्यात मदत होणार आहे. भाजपला या दोन अपक्ष आमदारांनी आधी पाठिंबा दिला होता. मात्र, भाजपला समर्थन देणारे हे आमदार शिवसेनेसोबत येणास तयार झाले आहेत.
दरम्यान, राज्यातला सत्ता संघर्ष शिगेला पोहचला आहे. शिवसेना; आघाडीसह एकत्र येऊन सत्ता स्थापन करू पाहत आहे. तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन झालं तर, ते सरकार अस्थिर असेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली मुंबईकरांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वांद्र्याच्या ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याचा अधिकृत तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीनं एकत्र यायला हवं, असा सूर दोघा वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत उमटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी सोमवारी सकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून शिवसेना बाहेर पडलीय. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्रिपदासह समसमान मंत्रिपदांचं वाटप करण्याचं आश्वासन भाजप नेतृत्वानं दिलं होतं. मात्र आता भाजपनं आपला शब्द फिरवला असून, उद्धव ठाकरेंनाच खोटं ठरवण्याचा खटाटोप केला. त्यामुळं शिवसेनेशी प्रतारणा करणाऱ्या भाजप सरकारमध्ये राहायचं नसल्यानं आपण मंत्रिपदाचा राजीनामा देतोय, असं अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.