मुंबई: खासगी वाहतूक सेवा पुरवणाऱ्या 'उबर' कंपनीने स्पीड बोट सेवा देण्याचा निर्णय घेतला होता. ही सेवा १ फेब्रुवारीपासून सुरु होणार होती, पण तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा लांबली आहे. उबरने रस्ते वाहतूक सेवा पुरवण्याच्या क्षेत्रात चांगलीच प्रगती केली आहे. त्याचबरोबर उबरने फूड डिलिव्हरी करण्यासाठी 'उबर इट्स' नावाची सेवाही चालू केली आहे. ऑर्डर केल्यावर योग्य ठिकाणी खाद्यपदार्थ घेवून जाण्याचे काम उबर इट्स चांगल्या प्रकारे पार पाडते. उबर अशाच प्रकारे जलवाहतूक सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी उबरने हा निर्णय घेतला आहे. तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या सहकार्याने १ फेब्रुवारीपासून जलसेवा देण्याची त्यांनी घोषणा केली होती. भारतात पहिल्यांदाच ही सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती उबरने त्यांचा ट्विटर अकाउंटवर पोस्ट केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरच मुंबईकरांना आणखी एक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे उबरकडून सांगण्यात आले होते. आता एकाच क्लिकवर उबरच्या स्पीड बोटचा आनंद घेता येणार आहे. सुरुवातीला ही सुविधा गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा असा प्रवास सुरु करण्यात येणार आहे. काही दिवसानंतर अलिबागपर्यंत सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवी मुंबई ते दक्षिण मुंबई असा प्रवास सुरु करण्यात येणार आहे. सुरुवातीला केवळ सहा जणांची बुकींग करता येणार आहे. त्यानंतर गरजेनुसार तुम्हाला संपूर्ण बोट बुक करण्याची सुविधा मिळणार आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा जमाव पाहायला मिळतो. तिथे आलेल्या पर्यटकांनाही या सेवेचा आनंद घेता येणार आहे. अद्याप उबर जलवाहतूक प्रवास सेवेचे दर किती असणार? याची माहिती मिळाली नाही.