दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक राज्यातील विधानसभा निवडणुकीबरोबरच होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आयोगाने शनिवारी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. मात्र, त्याळी सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर झाली नाही.


यानंतर दुसऱ्या दिवशी गुजरातमधील दोन विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. दुसऱ्या दिवशी जाहीर केलेल्या गुजरातमधील पोटनिवडणुकांसाठी महाराष्ट्राबरोबरच २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर शनिवारी महाराष्ट्राच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उदयनराजेंनी लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख न जाहीर केल्याबद्दल नाराजी जाहीर केल्याचे समजते. 


योगायोगाने त्याचदिवशी निवडणूक आयोगाने सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून लोकसभा निवडणुकीसंदर्भातील अहवाल तातडीने मागवून घेतला. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनीही दुसऱ्या दिवशी हा अहवाल निवडणूक आयोगाला सादरही केला. त्यामुळे साताऱ्याची पोटनिवडणूक २१ ऑक्टोबरलाच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येत्या एक-दोन दिवसांमध्ये यासंदर्भात घोषणा होऊ शकते. 


महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होईल. त्यामुळे साताऱ्यातील पोटनिवडणुकही याच दिवशी व्हावी, अशी अट उदयनराजे यांनी पक्षप्रवेशावेळी भाजपसमोर ठेवली होती. याशिवाय, पोटनिवडणुकीत दगाफटका झाल्यास राज्यसभेवर पाठवण्याचे आश्वासनही उदयनराजे यांनी भाजपकडून घेतल्याचे समजते. 


निवडणूक आयोगाने शनिवारी महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उल्लेख नव्हता. त्यामुळे उदयनराजे भोसले प्रचंड नाराज झाल्याचे समजते. त्यांनी आपली नाराजी भाजप नेतृत्त्वाला बोलूनही दाखवली. त्यामुळे आता भाजप आपले आश्वासन पाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. या टीकेला शरद पवार यांनीही चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे ही पोटनिवडणूक राष्ट्रवादीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांना आपली संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे.