मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरु असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक सध्या चांगलीच गाजत आहे. या बैठकीत लोकसभेच्या उमेदवारीवरून नेत्यांमध्ये बराच वाद होताना दिसला. मात्र, यामध्ये सर्वाधिक चर्चा राहिली ती उदयनराजे भोसले यांच्या नावाची. उदयनराजेंना साताऱ्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यास अनेकजणांचा विरोध आहे. आजच्या बैठकीत संबंधित नेत्यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी आणखी एका प्रसंगामुळे उदयनराजे भोसले यांची चर्चा झाली. उदयनराजे भोसले हे पक्षातील इतर नेत्यांशी फटकून वागतात, ही बाब सर्वश्रूत आहे. किंबहुना हेच अनेकांच्या नाराजीचे कारण आहे. त्यामुळे उदयनराजे पक्षाच्या अनेक कार्यक्रमांपासून दूर राहतात. आज मुंबईत बैठकीसाठी आल्यावर उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या मुख्यालयाचा पत्ता माहिती नसल्यामुळे त्यांची चांगलीच गोची झाली. 


उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या मुख्यालयात पहिल्यांदाच आले. त्यामुळे हे मुख्यालय शोधण्यात त्यांचा बराच वेळ गेला. शेवटी त्यांना फोनवरून मार्ग सांगण्यात आला.  परिणामी बैठक संपल्यानंतर उदयनराजे मुख्यालयात पोहोचले. उदयनराजेंनी मात्र वाहतूक कोंडीमुळे आपल्याला उशीर झाल्याचे सांगितले.