`बेस्ट` तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात
मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांनी उद्या संपाची हाक दिल्यानं पालिका प्रशासनाची पळापळ सुरु झालीय.
मुंबई : मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांनी उद्या संपाची हाक दिल्यानं पालिका प्रशासनाची पळापळ सुरु झालीय. महापौर बंगल्यावर या संदर्भात खलबतं सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त आणि बेस्ट कृती समिती यांची महत्त्वाची बैठक सुरु आहे. उद्याचा नियोजित संप मागे घेण्यासाठी बेस्ट व्यवस्थापन आणि पालिका प्रशासनाची धावपळ सुरु आहे.
१० ऑगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येतील, असं आश्वासन महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी दिलं होतं. मात्र लेखी आश्वासनाच्या मागणीवर बेस्ट कर्मचारी संघटना ठाम आहेत. दरम्यान दुस-या बैठकीतही बेस्ट कर्मचा-यांच्या मागण्यांवर तोडगा निघू शकला नाही. मात्र जुलैचा पगार 10 तारखेपर्यंत देऊ आणि यापुढेही पगार वेळेवर मिळेल याबाबत निर्णय झाल्याची माहिती बेस्ट महाव्यवस्थापकांनी दुस-या बैठकीनंतर दिलीय. सर्व कर्मचारी आणि अधिका-यांनी संपावर जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलंय.