उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडी आता आणखी जलद झाल्या आहेत.
मुंबई : राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडी आता आणखी जलद झाल्या आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांच्या बैठका आता वाढलेल्या दिसत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. भाजपच्या प्रस्तावाबरोबरच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. उद्या होणाऱ्या या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यातला सत्तासंघर्ष तीव्र झालेला असताना उद्धव ठाकरेंच्या मनात नेमकं काय चाललं आहे? उद्धव ठाकरे नेमकं कुणाचं ऐकणार? उद्धव संजय राऊत यांचं ऐकणार? मोदी-शाह यांचं ऐकणार? फडणवीसांचं तर त्यांनी गेल्या १४ दिवसात ऐकलंच नाही. सरसंघचालकांचं ऐकणार? मोदींचे गुरू शरद पवारांचं ऐकणार? उद्धव भाजपाशी तडजोड करणार? उद्धव मुख्यमंत्रिपदाची मागणी सोडणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या सगळ्या प्रश्नांच्या मोहजालात सध्या उद्धव अडकलेत. कारण उद्धव ठाकरेंच्या मनात चाललंय काय याचा थांगपत्ता उद्धव लागू देत नाहीत. सध्या शिवसेनेचं ओन्ली मिस्टर राऊत सुरू आहे.
राऊत कितीही बोलत असले तरी उद्धव ठाकरे राऊतांचं ऐकतात का? हा प्रश्न आहे. राऊतांना शिवसेनेचे डेव्हिल अॅडव्होकेट म्हटलं जातं. जे करायचंच नाही, त्याबद्दल बोलणाऱ्यांना डेव्हिल अॅडव्होकेट म्हणतात, त्यामुळे उद्धव ठाकरे राऊतांचं ऐकतातच असं नाही. शिवसेनेतही सत्तास्थापनेबद्दल दोन मतप्रवाह आहेत. एका गटाला भाजपासोबत जायचंय, तर हीच ती वेळ भाजपाला धडा शिकवण्याची, असं दुसऱ्या गटाची मागणी आहे. आता निर्णय घ्यायचाय तो उद्धव ठाकरेंना.