मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतरही सरकारची ‘बुलेट मस्ती’कायम आहे. विदर्भातील १८ शेतकऱ्यांचे विषारी मरण ना सोशल मीडियातील भक्तांना दिसले ना विदर्भातील मंत्र्यांच्या डोळय़ांच्या कडा त्यामुळे ओलावल्या, अशा रोखठोक शब्दात शिवसेनेने भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लेख लिहीला आहे. यात  सरकार कुठे आहे? असा सवाल विचारत नागपुरात मेट्रो ट्रेनच्या रंगीत तालमीची सुरुवात होत असतानाच व भारतीय जनता पक्षाचे बडे नेते नागपुरात हजर असताना हे शेतकऱ्यांच्या कीटकनाशक मृत्यूचे कांड घडले आहे. मुंबईत अहमदाबादवरून बुलेट ट्रेन येईल व नागपुरात मेट्रो ट्रेन तरंगत येईल. म्हणजे ‘‘विकास झाला हो’’ अशी बोंब मारणाऱ्यांनी यवतमाळमध्ये १९ शेतकरी का मेले व हजारावर शेतकरी मरणाच्या दारात कसे उभे आहेत याचा विचार करायला हवा, असा सनसनीत टोला ठाकरे यांनी सरकारला लगावला आहे.


विदर्भातील १८ शेतकऱ्यांचे हे विषारी मरण ना सोशल मीडियातील भक्तांना दिसले ना विदर्भातील मंत्र्यांच्या डोळय़ांच्या कडा त्यामुळे ओलावल्या. त्यांच्या दृष्टीने सगळे काही आलबेल आहे व ‘अच्छे दिन’चे कारंजे थुई थुई नाचत आहेत, अशी उपहासात्मक टीकाही ठाकरे यांनी केली आहे.