पाठिंब्याचे पत्र न दिल्याने उद्धव ठाकरे राष्ट्रवादीवर नाराज; फोनवरून पवारांशी चर्चा
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्तास्थापन होणार नाही
मुंबई: मोठ्या दिमाखात राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेलेल्या शिवसेनेला सोमवारी हात हलवत माघारी यावे लागले. शिवसेनेच्या या फजितीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऐनवेळी बदललेली भूमिका कारणीभूत मानली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रचंड नाराज झाल्याचे समजते. त्यांनी फोनवरून शरद पवार यांना ही नाराजी बोलून दाखवल्याचेही समजते. राष्ट्रवादीतील आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र मिळाले असते तर किमान सत्तास्थापन करण्याच्यादृष्टीने पाऊल तरी टाकता आले असते, असे त्यांनी खासगीत बोलल्याचे कळते.
माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही- शरद पवार
मात्र, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेशी मंगळवारी सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्तास्थापन होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
आज सकाळपासून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने राज्यात सरकार स्थापन करणार असल्याची जोरदार हवा होती. शिवसेनेचे शिष्टमंडळ राजभवनात दाखल झाल्यावर राज्यभरात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जल्लोषालाही सुरुवात केली होती. परंतु, काहीवेळातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्रे राजभवनापर्यंत पोहोचलीच नसल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वांचे चेहर खर्रकन उतरले.
वातावरण फिरलं, शिवसेनेच्या गोटात चिडीचूप शांतता
यानंतर राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिले. आता राष्ट्रवादीकडे आपले संख्याबळ सिद्ध करण्यासाठी २४ तासांचा अवधी आहे. त्यामुळे हे आमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारणार का?, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.