शिवसेना आणि शिवाजी पार्क... एक अतूट नातं
एक नेता, एक पक्ष आणि एक मैदान हे शिवसेनेचं लाडकं समीकरण.
मुंबई : एक नेता, एक पक्ष आणि एक मैदान हे शिवसेनेचं लाडकं समीकरण. म्हणूनच उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी शिवाजी पार्कवर होत आहे. शिवाजी पार्क म्हणजेच शिवसेनेच्या भाषेत शिवतीर्थ. शिवतीर्थ आणि शिवसेनेचं नातं अतूट आहे.
अरबी समुद्राच्या समोर पसरलेलं हे विस्तीर्ण मैदान. ब्रिटीशांनी राखीव ठेवलेल्या या मैदानाचं पूर्वीचं नाव माहीम पार्क होतं. नंतर याचं नाव शिवाजीपार्क झालं. ३० ऑक्टोबर १९६६ चा तो दिवस. शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजीपार्कवर झाला. त्यावेळी शिवाजी पार्क खचाखच भरुन दाखवण्याची किमया केली ती बाळासाहेब ठाकरेंनी. तब्बल ४ लाख लोक या मेळाव्याला उपस्थित होते. तेव्हापासून जुळलेलं शिवतीर्थ, शिवसेना आणि मराठी माणूस हे गणित कायम आहे. त्यानंतर बाळासाहेबांच्या, युतीच्या प्रत्येक सभेला हे मैदान खचाखच भरलं.
महाराष्ट्रात पहिल्यांदा युतीचं सरकार आले, त्यावेळी मनोहर जोशी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले, त्यांनी शपथ घेतली ती शिवाजीपार्कवरच. बाळासाहेब ठाकरेंनी आदित्यला तलवार दिली तीही या शिवाजीपार्कवरच. बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले ते याच शिवतीर्थावर. याच शिवतीर्थावर शिवसैनिकांनी त्यांच्या लाडक्या साहेबांना अखेरचा निरोप दिला.
बाळासाहेबांच्या स्मृती जपणारी अखंड ज्योत आजही या स्मृतीस्थळावर तेवतेय आणि शिवसैनिकाला प्रेरणा देतेय. शिवसेनेनं आनंदाचे, विजयाचे, भारावून जाण्याचे अनेक क्षण या शिवतीर्थाच्या साक्षीनं अनुभवलेत. म्हणूनच पहिले ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत याच शिवतीर्थावरुन. ठाकरे, शिवसेना आणि शिवतीर्थ या समीकरणातला आणखी एक महत्त्वाचा विजयी क्षण साजरा होत आहे.