मुंबई : वांद्रे येथे बाहेरच्या राज्यातील मजुरांनी घरी जाण्यासाठी जी गर्दी केली होती, त्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, वांद्रे येथे आज गर्दी जमली, हे सत्य आहे. सर्व चॅनल्सला त्याच बातम्या आहेत. या लोकांमध्ये कुणीतरी अफवेचं पिल्लू सोडलं असावं, आज ट्रेन सुटणार आहेत. यावर हिंदीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही हिंदुस्थानी आहात, आपल्यासमोर आव्हान आहे, आपण या आव्हानाचा सामना मिळून करू या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे म्हणाले, हे गरीब लोक आहेत, या गरीब लोकांच्या भावनांशी खेळू नका, आणि कुणी यांच्या भावनांशी खेळत असले, तर कायद्यातून ते सुटणार नाहीत. मी मुल्ला मोलवी यांच्याशी देखील बोलत आहे. आम्ही सर्व काही पुरवत आहोत, आणखी काही त्रुटी असतील तर त्या देखील पूर्ण केल्या जातील.


जेव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा केंद्राशी बोलून मार्ग नक्की काढू, हे माझं राज्य आहे, तुम्ही येथे सुरक्षित आहात, चिंता करू नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी सर्व बाहेरील मजुरांना केलं आहे.


वांद्रे येथे जी घटना घडली त्याचं राजकारण करू नका, एकजुटीने कोरोनाविरोधात लढण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, तसेच कुठून कसा खर्च करायचा, हे कुणी सांगण्याची गरज नाही. निधी आहे आम्ही योग्य प्रकारे खर्च करत आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


मुंबईत आज ट्रेन सुटणार या अपेक्षेने अनेक मजूर वांद्रे स्टेशननजीक जमले होते, काही दिवसांपूर्वी गुजरातच्या सुरतमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मजूर घरी जाण्याच्या अपेक्षेने रस्त्यावर आले होते.