मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि सुनील तटकरे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेने प्रचंड जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या सगळ्या चर्चेला आणखीनच हवा मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना छगन भुजबळ आणि सुनील तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा प्रत्येक प्रश्नाला योग्यवेळी योग्य ते उत्तर मिळेल, असे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. 


३० जुलैला नाशिक आणि दिंडोरी भागातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना भुजबळांनी पक्षप्रवेशाचा मुद्दा फेटाळला होता. तर समीर भुजबळ यांनीही बुधवारी हे वृत्त फेटाळून लावले होते. 


मात्र, उद्धव ठाकरेंनी याविषयी संभ्रमात टाकणारे वक्तव्य केल्याने हा गोंधळ आणखीनच वाढला आहे. त्यांनी भुजबळांच्या पक्षप्रवेशाचा मुद्दा पूर्णपणे नाकारला नसल्याने आता काय घडणार याकडे, सर्वांचे लक्ष लागले आहे. 


तत्पूर्वी सुनील तटकरे यांच्या दिल्लीवारीनेही राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगल्या आहेत. मात्र, सुनील तटकरे यांनी तुर्तास या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. उलट राष्ट्रवादीतील काही नेत्यांना शिंगं फुटल्यामुळे ते इतर पक्षात जात असल्याची टीका त्यांनी केली. 


दरम्यान, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी खरोखरच शिवसेनेत प्रवेश केल्यास हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का असेल. हे दोघेही राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. त्यामुळे या दोघांच्या शिवसेनेत जाण्याने नाशिक आणि कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान होऊ शकते.