मुंबई : विधानपरिषद निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी रंगशारदा सभागृहात शिवसेनेची बैठक पार पडते आहे. मात्र या बैठकीचं वृत्तांकन करण्यास प्रसारमाध्यमांना मनाई करण्यात आली आहे. शरद पवार यांनी कालच राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन बोलतांना पुण्यात भाजप विरुद्ध सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र येण्याचं केलेलं आवाहन केलं होतं. 2019 निवडणुकीमध्ये सर्व पक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव अटळ आहे असं देखील शरद पवारांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'सगळ्यांच्या ऑफर आल्यानंतर मी बोलेन.' अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आधी भाषण केले. 2019 साठी त्यांनी पुन्हा स्वबळाची भूमिका मांडली आहे. तोच मुद्दा उद्धव यांनीही त्यांच्या भाषणात मांडला. यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. कुठल्याही परीस्थित विजय हेच आपलं पुढचं ध्येय आहे. असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं.


नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत नरेंद्र दराडे आणि विप्लव बजोरीया हे आपले उमेदवार जिंकले. दराडे यांच्याकडे 250 मते होती तर विप्लव बाजोरीया यांच्याकडे 97 मते होती. तरीही आपण त्या परिस्थितीत विजय खेचुन आणला. अशी कुटुंबं मला शिवसेनेत चालणार आहेत. ही विधान परिषद निवडणूकही आपण जिंकणार आहोत. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.


मुंबई पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या जागांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठकीत मार्गदर्शन करत आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी अलिकडेच ठाकरेंची भेट घेतली होती. मात्र त्यानंतरही शिवसेनेनं स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची तयारी चालवली असून, पक्षाच्या रणनीतीबाबत कमालीची गुप्तता पाळली जाते आहे.