मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. विमा कंपन्यांनी आणि बॅंकांनी १५ दिवसांत जी काही प्रकरणे आहेत, ती निकाली काढली पाहिजे. अन्यथा आम्हा १६ व्या दिवसांपासून शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा थेट इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नसून शिवसेनेने याविरोधात मुंबईत आज मोर्चा काढला आहे. हा मोर्चा वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ‘भारती अॅक्सा’वर धडकला. शिवसेना झिंदाबाद, आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला आहे. उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.


यावेळी युवासेनेचे आदित्‍य ठाकरे, खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, शिवसेना सचिव आदेश बांदेकर सहभागी झाले होते. खासगी विमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चासाठी शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या मोर्चाच्यावतीने शिवसेनेने मोठे शक्तिप्रदर्शन केले.



शेतकर्‍यांना नडणार्‍यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. सरकारच्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. सगळ्या कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची नावे बँकांनी लावली पाहिजेच, अशी मागणी त्यांनी केली. काही ठिकाणी कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले गेले, मात्र कर्जमाफी झालीच नाही. हे सगळे प्रकार टाळण्यासाठी ही मागणी आम्ही केली आहे, असे ते म्हणाले. 


बुधवारचा मोर्चा हा एका कंपनीवर प्रतीक म्हणून जाईल, इतर कंपन्यांवर आमची शिष्टमंडळे जातील. शिवसेना कायम शेतकर्‍यांसोबत आहे, असेही सांगत उद्धव ठाकरे यांनी जी काही प्रकरणे आहे, ती १५ दिवसांत निकाली काढा असे सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.