मुंबई: दूरसंचार क्षेत्रापाठोपाठ दूरचित्रवाणी वाहिन्या आणि इंटरनेट सेवा क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत असलेल्या रिलायन्स जिओवर शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली. केवळ डिजीटल इंडियाने लोकांची पोटं भरणार नाहीत. एवढंच असेल तर इंटरनेटसोबत रेशन आणि जीवनावश्यक वस्तू मोफत द्या, असा टोला उद्धव यांनी लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक केबल व्यवसायिकांना बाजूला ठेवून थेट ग्राहकांना स्वस्तात सेवा देण्याची ‘जिओ’ची योजना आहे. त्यामुळे दूरचित्रवाणी वाहिन्या आणि इंटरनेट सेवा पुरवणारे केबल चालकही बेकारीच्या भीतीने धास्तावले आहेत. या व्यवसायात लाखो तरुण असून त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती आहे. 


इंटरनेट सारख्या सेवा पहिल्यांदा फुकट वाटायच्या, काही महिन्यांत प्रतिस्पर्धी नामोहरम होऊन संपले की नंतर अव्वाच्या सव्वा दर वाढवायचे. मोफत द्यायचे असेल 50 वर्षांचा करार करून मोफत सेवा वाटा. शिवसेना केबलचालकांच्या पाठीशी राहणार. भाजी-भाकरी काढून घेतल्यावर डिजीटलने कसे पोट भरेल. कोणीही व्यवसाय करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, त्यामुळे इतरांच्या पोटावर पाय येऊ नये, असे उद्धव यांनी सांगितले.