मुंबई : ईडीच्या कारवाईवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. सत्तेचा आणि अधिकारांचा गैरवापर होऊ नये, असं उद्धव ठाकरेंनी भाजपाला अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. सामनाला दिलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात त्यांनी ईडी आणि सीबीआयच्या गैरवापराच्या मुद्यावर मित्रपक्ष असलेल्या भाजपाला खडे बोल सुनावलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्ता मिळाली म्हणून सुडाचं राजकारण करू नये, असंही ते म्हणालेत. लोकशाहीत एकमेकांच्या विचारांचा आदर केला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दुसरीकडे पावसाळ्यात दोन तीन वेळा मुंबई तुंबण्याला त्यांनी मेट्रोच्या कामांना जबाबदार ठरवलं. मुंबई तुंबण्याला मेट्रोशी संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.


महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी युती करताना तडजोड केल्याची कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली. सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी युती करण्यामागची कारणं स्पष्ट केली. महाराष्ट्राच्या जनतेचा युतीला कौल आहे. त्यामुळं युती केल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.


जागावाटपात समसमान नसलो तरी निवडणूक निकालानंतर सत्तेचा वाटा समसमान असेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. भविष्यात युती तुटणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली.