मुंबई : मार्मिक वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. लोकमान्य टिळक आणि वंदे मातरम वादावर त्यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं. ज्यांनी उत्सवाचे चळवळीत रुपांतर केलं त्या लोकमान्यांना आपण विसरत असू तर आपल्यापुढे काळोखाशिवाय दुसरं काही नाही. कपाळकरंटे म्हणून आपली इतिहासात नोंद होईल, असं त्यांनी यावेळी भाजपला सुनावलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातल्या गणेशोत्सवाबाबतच्या बातम्या संताप आणणाऱ्या आहेत. गणेशोत्सवावरचा लोकमान्यांचा चेहराच काढून टाकला. इतका कोडगेपणा, निर्लज्जपणा आपल्यात आला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.


तर चॅनेलच्या माणसांनी भाजपच्या आमदार खासदारांना पकडलं वंदे मातरम् म्हणून दाखवा मात्र चार ओळीही म्हणता आल्या नाही, त्यांना घाम फुटला अशी मार्मिक कोपरखळी मारली.


उत्तर प्रदेशमध्ये 15 ऑगस्टला मदरशांमध्ये देशभक्तीची परीक्षा घेणार. आणखी कुणी तरी म्हणतेय की झेंडावंदन करू पण राष्ट्रगीत म्हणणार नाही. माझा त्यांना सवाल आहे कोणत्या राष्ट्राचा झेंडा तुम्ही फडकवणार आहात ? झेंडा आमच्या देशाचा फडकवणार असाल तर आमचे राष्ट्रगीत म्हणावेच लागेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.


विधानसभेत नाकावर टिचून सांगतात आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही असे अबू आझमी म्हणतो. काय केलं आपण ? फक्त थयथयाट आदळआपट करायची. देशभक्तीचे प्रेम थोतांड असता कामा नये. करायचा असेल तर वंदे मातरम कायदा करा, असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारला दिला आहे.