अमितचा साखरपुडा, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीकडे अनेकांचं लक्ष
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित आणि प्रसिद्ध बाल रोगतज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली यांचा आज साखरपुडा होणार आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित आणि प्रसिद्ध बाल रोगतज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली यांचा आज साखरपुडा होणार आहे.
अमित-मितालीचा साखरपुडा
राज ठाकरे आणि शर्मिला यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत अमित आणि मिताली यांचा साखरपुडा होईल. अमित-मिताली गेली पाच वर्षे एकमेकांच्या प्रेमबंधात आहेत. महाविद्यालयीन शिक्षणावेळी एकमेकांशी सूर जुळले होते. अमित वाणिज्य पदवीधर तसेच बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण तसेच व्यंगचित्रकार आणि मनसे राजकारणात सक्रिय आहे. तर मिताली फॅशन डिजायनिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अमित ठाकरे नुकताच एका दुर्धर आजाराशी लढून सुखरूप बाहेर आला आहे.
उद्धव ठाकरे येणार का?
महालक्ष्मी रेसकोर्सवर असलेल्या टोड्स हॉटेलमध्ये अमित-मितालीचा साखरपुडा होणार आहे. हा अत्यंत खाजगी सोहळा असेल. तर या सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल. अमित लवकरच मनसेच्या सक्रिय राजकारणात पूर्णपणे दिसण्याची शक्यता आहे. तसंच लवकरच मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदाची सूत्र अमित यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.