`बालमोहन`कर ते मुख्यमंत्री.... उद्धव ठाकरेंचा प्रवास
उद्धव ठाकरेंच्या पाठी शिक्षकांची शाबासकीची थाप
मुंबई : नाट्यमय घडामोडींनंतर अखेर महाराष्ट्रविकासआघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरूवारी सायंकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार याचा आनंद शिवसैनिकांबरोबरच बालमोहन शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना देखील आहे. उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील हे दोघेही बालमोहन शाळेचे विद्यार्थी.
बालमोहनचे माजी मुख्याध्यापक पुरूषोत्तम नाईक यांच्याशी झी चोवीस तासने संवाद साधला
उद्धव ठाकरे बालमोहन शाळेचे विद्यार्थी. 'दुसरी तिसरीपासून मी उद्धवला ओळखत आहे, असं शाळेचे माजी मुख्याध्यापक पुरूषोत्तम नाईक म्हणाले. अतिशय शांत स्वभाव आणि मितभाषी असा उद्धव होता. त्याची एकही तक्रार कधी कुठल्याही शिक्षकाने केलेली नाही. बालमोहनचा विद्यार्थी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल अशी कुणी कल्पनाही केली नव्हती, असे उद्धव ठाकरेंचे मुख्याध्यापक म्हणाले. उद्धव ठाकरे शिवसेनेत मोठे झाले तरी त्यांचा स्वभाव, त्यांची भाषा बदलली नाही, असे त्यांचे मुख्याध्यापक सांगतात. (उद्धव कृष्ण तर मी सुदामा... 40 वर्षांच्या मैत्रीचा प्रवास)
'मुख्यमंत्री झाल्यावर तरी उद्धव ठाकरेंच्या स्वभावात काही बदल होईल किंवा त्यांच्या तोंडून काही रागाचे शब्द निघतील की नाही?याबाबत मला शंका वाटते. आम्हा बालमोहनच्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना त्यांचा सार्थ अभिमान होता आणि आहे. बाळासाहेबांच्या पासून त्यांच्या घराशी माझा संबंध आलेला आहे. ठाकरे कुटुंबीय म्हणजे अत्यंत प्रेमळ लोक. ('या' शाळेचे दोन माजी विद्यार्थी, एक मुख्यमंत्री तर दुसरा उपमुख्यमंत्री होणार ?)
बाळासाहेब स्टेजवर उभे राहिले की वेगळे असायचे आणि घरी वेगळे. मीनाताई ठाकरे देखील प्रेमाने वागायचे. इतर मुलंही आमच्याशी अत्यंत आदराने आणि प्रेमाने वागायचे. कुणावरही रागवणार नाही हा विश्वास मुख्याध्यापकांनी व्यक्त केला. आघाडीच सरकार असलं तरीही तो सर्वांना सांभाळून घेऊन उत्तम कारभार करेल, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही, अशी शाबासकीची थाप मुख्याध्यापकांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीवर मारली आहे.