मुंबई : हिंगणघाट जळीत हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल यावर कटाक्ष असणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा काम करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.


या घटनेतील तपासात कुचाराई होऊ दिली जाणार नाही. पीडिता, तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल यासाठी शासनाचे संबंधित विभाग समन्वयाने काम करतील. खटला वेगाने आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा रितीने चालविण्यात येईल. त्यासाठी अँड. निकम यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


हिंगणघाटमधल्या शिक्षिकेचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी ६.५५ च्या सुमारास मृत्यू झाला. आठवडाभर मृत्यूशी सुरु असलेली तिची झुंज अखेर संपली. हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. आरोपीला दयामाया दाखवणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे. तर पीडितेच्या भावाला राज्य शासनामध्ये नोकरी देण्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.


हिंगणघाट जळीतकांडातल्या पीडितेच्या मृत्यूनंतर सरकारनं कडक कायदा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा केल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिकांनी दिली आहे. तर कठोर कायद्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही सांगितलं आहे. 


३ फेब्रुवारीला ही शिक्षिका कामवर जात असताना आरोपी विकेश नगराळेने भर रस्त्यात पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यात पीडिता ४० टक्के भाजली. पीडितेची अन्ननलिका, श्वासनलिकाच जळल्याने तिचा जीवनसंघर्ष सुरु होता. डॉक्टरांकडून सुरु असलेल्या सर्व उपचारांना अपयश आले.