चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गुन्हेगारी टोळ्यांकडून उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Crime) सातत्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच पुन्हा एकदा उल्हासनगर एका हत्येने हादरलं आहे. उल्हासनगरमध्ये शिवसेना शाखाप्रमुखाची निर्घृणपणे हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी (Ulhasnagar Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. हा सर्व हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हासनगर कॅम्प नंबर पाचच्या जय जनता कॉलनी परिसरात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शिवसेना शाखाप्रमुख शब्बीर शेख याची निर्घृण हत्या करण्यात आली. शब्बीर शेख घराबाहेर उभा असताना अचानक आलेल्या 7 ते 8 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, शब्बीरचा जागीच मृत्यू झाला. रक्तच्या थारोळ्यात पडलेल्या शब्बीरला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. शवविच्छेदनासाठी उल्हासनहारच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आला आहे.


ही हत्या विक्रम कवठणकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी केल्याची म्हटले जात आहे. तर पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फिटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी धारधार चाकू जप्त केले आहेत. तसेच आरोपीच्या अटकेसाठी उल्हासनगर क्राईम ब्रांच आणि हिललाईन पोलीस ठाण्याचे पथक रवाना झाले आहेत. मात्र आरोपींच्या अटकेनंतर हत्येचे खरं कारण समोर येणार आहे.


शिंदे गटाच्या नेत्याच्या हत्येसाठी सुपारी


काही दिवसांपूर्वी उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मध्ये शिंदे गटाचे नेते आणइ बांधकाम व्यावसायिक सुनील सिंग यांच्या हत्येसाठी सुपारी दिल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी लाखी उर्फ ​​कारी मखिजा आणि सुनील शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यामध्ये सुनील शर्माला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे शिंदे गटाचे विभागप्रमुख सुनील सिंग आणि कारी माखिजा यांच्यात वाद सुरू होता. याआधीही सुनील सिंह यांनी कारी मखिजा यांच्या विरोधात खंडणीची मागणी केल्याची तक्रार मध्यवर्ती पोलिसांकडे केली होती. त्यानंतर हत्येसाठी सुपारी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. सुनील सिंह यांना दोन जणांनी माहिती दिली की, कारी मखिजा याच्या कार्यालयात त्यांच्या हत्येचा कट रचला जात आहे आणि त्यासाठी सुनील शर्मा नावाच्या तरुणाला 10 लाखांची सुपारी देण्यात आली होती.