Police Seize 4.5 Crore Worth Drugs From Genral Store: अंबरनाथमधील मलंगगड भागातील नेवाळी गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामध्ये स्थानिक पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. येथील एका किराणा मालाच्या दुकनावर टाकलेल्या छाप्यामध्ये कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने साडेचार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. एका गावातील छोट्याश्या दुकानामध्ये पोलिसांना तीन किलो मॅफ्रोड्रोन नावाचा अंमली पदार्थाचा साठा सापडला आहे. पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारी केल्याची माहिती दिली आहे. सदर प्रकरणामध्ये हिललाइन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


छापेमारीनंतर अनेक प्रश्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी या साडेचार कोटींच्या ड्रग्जच्या छापेमारीनंतर एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव राजेश कुमार प्रेमचंद तिवारी असं आहे. राजेशचा साथीदार असलेला शैलेंद्र अहिरवार फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. हा एवढा मोठा साठा इथं या दोन तस्करांनी नेमका कुठून आणला? तो पुढे कोणाला विकला जाणार होता? हे मोठं रॅकेट आहे का? यामध्ये किती जणांचा समावेश आहे? पुरवठादार आणि मागणी करणारे कोण आहेत? या आणि असा असंख्य प्रश्नांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. या साठ्यासंदर्भातील गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच आधारे छापेमारी करण्यात आली आहे. 


अशी केली छापेमारी


कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली ही छापेमारी करण्यात आली. 20 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही छापेमारी करत आरोपीला ताब्यात घेतलं. निलेश पवार यांना पोलीस खात्याच्या गुप्तहेरांकडून नेवाळी गावात अंमली पदार्थांचा मोठा साठा असल्याची माहिती मिळालेली. पोलीस खरं तर मागील बऱ्याच काळापासून या भागात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या मागावर होते. त्याचवेळी त्यांना गुप्तहेरांकडून काटई-बदलापूर पाइपलाइन क्रॉस रोडवरील कल्याण-मलंगगड रोडवरील नेवाळी गावातून तस्करी सुरु असल्याचं समजलं. या गावातील गायत्री किराणा स्टोअरमध्ये अंमली पदार्थांचा साठा असून त्याची लपूनछपून विक्री केली जात असल्याचं समजल्यानंतर पूर्व नियोजित पद्धतीने या दुकानावर शुक्रवारी छापेमारी करण्यात आली.


उत्तर प्रदेश कनेक्शन


राजेश तिवारी आणि शैलेंद्र अहिरराव हे दोघेही बऱ्याच काळापासून अंमली पदार्थांची तस्करी करतात. त्यांच्या निकटवर्तीयांच्या माध्यमातूनही महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेशमध्ये अशी तस्करी सुरु आहे. किराणा दुकानाच्या नावाआड राजेश अंमली पदार्थांचा धंदा करत होता असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. नेवाळीमधील साठाही उत्तर प्रदेशातून आलेला नाही ना यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. या छापेमारीमुळे कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथबरोबर ठाणे जिल्ह्यातील अंतर्गत भागातील ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.