COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज शिवसेना आमदारांच्या असंतोषाचा कडेलोट होण्याची चिन्हं आहेत. 'झी 24 तास'च्या माहितीत हा असंतोष बंडाचं रूप घेण्याच्या तयारीत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. उद्धव ठाकरे एकीकडे स्वबळावर ठाम असताना, निवडणुका तर दूरच, पावसाळी अधिवेशनाआधीच शिवसेनेतली खदखद वाढली आहे.


महाराष्ट्राच्या राजकारणातली ही मोठी घडामोड माणली जात आहे. शिवसेनेत तरुण आमदारांमध्ये खदखद वाढली आहे. विधान परिषद विरुद्ध विधानसभा वाद पेटला आहे. शिवसेनेतल्या नाराजांनी यावेळी मात्र शेंडी तुटो वा पारंबी इतकी टोकाची भूमिका घ्यायचं ठरवलं आहे. मंत्रिमंडळ फेरबदलात तरुणांना संधी हवी आहे. स्वबळाचा नारा सेनेत नापसंत ठरतो आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेत सर्वाधिक नैराश्य दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचे दहा आमदार आहेत.  


हातकणंगलेचे डॉ सुजीत मिंचेकर
शिरोळचे उल्हास पाटील 
करवीरचे चंद्रदीप नरके  
कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर 
शाहुवाडीचे सत्यजीत पाटील 
राधानगरी बुधरगडचे प्रकाश अबीटकर 
सांगलीचे अनिल बाबर
साताऱ्यातल्या पाटणचे शंभुराजे देसाई 
पुण्याच्या पुरंदरचे विजय शिवतारे
खेड आळंदीचे सुरेश गोरे  


लोकांतून निवडून येऊनही मंत्रीपद हुकल्यानं गेली 4 वर्षं ते अस्वस्थ आहेत. त्यातच, भाजप सत्तेच्या सारिपाटात नगाला नग देऊ पाहतेय. त्यामुळे, 2019ला स्वबळावर कसं निवडून यायचं याचा प्रश्न अनेकांना पडला आहे. 


शिवसेना म्हणजे निष्ठा. भगवा हेच दैवत आणि ठाकरे म्हणजे प्रमाण. या समीकरणांना हादरा बसेल अशी ही बातमी आहे. साहेबांच्या इच्छेने आणि बाळराजांच्या हट्टाने आपली राजकीय कारकीर्द धोक्यात घालायला अनेक सैनिक तयार नाहीत. त्यांना कमळ खुणावतंय. दादा आणि रावांचा गळ कधीचा त्यांच्या मागावर आहे. अशात जमलं तर ठीक नाहीतर पावसाळ्यात विदर्भात जाण्यापेक्षा हे आमदार पश्चिम महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यात बांधणी करायचा मूड बाळगून आहेत. मातोश्रीला त्याची फिकीर आहे की नाही ते पाहणं रंजक ठरेल.