Budget 2020 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे.
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण सकाळी ११ वाजता तो सादर करत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेची सध्याची मंदगती पाहता सरकार त्यात उत्साहाचे वातावरण आणण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी काय घोषणा करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, असे असले तरी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. दरम्यान, या अर्थसंकल्पाचे शेअर बाजारावरही याचे पडसाद उमटण्याची शक्यता होती. त्याआधीच अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजार सुरु होतानाच घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स १४० अंकांनी कोसळला असून निफ्टीची १२६.५० अंकांची घसरण झाली आहे.
बेरोजगारी, देशाची ढासळती अर्थव्यवस्था आणि मंदीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्यानंतर त्या संसदेत पोहोचल्या. संसदेत कॅबिनेटच्या बैठकीत अर्थसंकल्पाला आधी मंजुरी देण्यात येईल. शुक्रवारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करण्यात आला असून त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी समोर आली आहे.
देश मंदीला सामोरं जात असताना आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात मात्र विकास दर 6 ते 6.5 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काय स्वस्त होणार? काय महाग होणार? रेल्वेला काय मिळणार? शेतकऱ्यांना काय मिळणार? टॅक्स स्लॅब बदलणार की जैसे थेच राहणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज काही तासांत मिळतील. विरोधक सातत्याने मोदी सरकारला ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष करत आहेत. त्यातच आगामी दिल्ली निवडणुका, वर्षअखेर बिहार निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणा होणार का याची उत्सुका आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा असेल की विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे तोंडाला पानं पुसणारा हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.