कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (union minister narayan rane) यांनी मुंबईतून आजपासून जनआशीर्वाद यात्रेला धडाक्यात सुरुवात केली. विमानतळावर उतरल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.  त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं (Balasaheb  Thackeray smriti sthal) दर्शन घेतलं. त्यानंतर नारायण राणे मुंबई पिंजून काढत आहेत. यादरम्यान त्यांनी शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार प्रहार केला आहे. तसेच विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं आहे. (union minister narayan rane critisized cm uddhav thackeray and shivsena in lalbaug during janashirvad yatra)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणेंचा थेट इशारा... 


"मुंबई महापालिका हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. कुठून कसे पैसे येतात हे मला माहिती आहे. यांनी इंजेक्शन खरेदीत 12 टक्के घेतले . भ्रष्टाचार उघड करा असे त्यांनी सांगावे, उद्यापासून सुरू करतो", असा इशारा राणेंनी यावेळेस दिला. राणे लालबागमध्ये बोलत होते.  


"अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सीएमना प्रश्न विचारला तर यांना काही माहिती नाही. सलून उघडून बसला आहेस का? यावेळेला महापालिकेत परिवर्तन झाले पाहिजे. अनेक वाझे निर्माण झालेत. कुंपणच शेत खातंय. आपल्या लोकांना आता यूपीत जावून नोकरी करायला जाण्याची वेळ येवू नये. वरचे सरकार आमचे आहे. लवकरच सगळं बाहेर येईल. जास्त हालचाल करू नका, नाड्या आमच्या हातात आहेत, असं म्हणत राणेंनी थेट इशारा दिला आहे.   


विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन


"मी आतापर्यंत अनेक पदे सांभाळली. आता हे शेवटचे पद आलंय माझ्याकडं. या विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. लोकांचा प्रतिसाद पाहून अनेकांच्या पोटात दुखतंय. बाळासाहेबांच्या स्मारकावरही गेलो. मी जो आहे तो बाळासाहेबांमुळं आहे. शुभेच्छा द्यायला मनाचा मोठेपणा लागतो. साहेबांचा मुलगा मुख्यमंत्री असूनही स्मारकाचे सुशोभिकरण करायला पैसे नाहीत, अशी टीका नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली. ते लालबागमध्ये बोलत होते.  


सगळ्या लालबागमध्ये गोमूत्र शिंपडणार का? 


नारायण राणेंनी स्मृतिस्थळावर जाऊन शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीचं दर्शन घेतलं. मात्र त्यानंतर काही शिवसैनिकांनी स्मृतिस्थळाचं गौमुत्राने शुद्धीकरण केलं. यावरुनही राणेंनी चोख प्रत्युत्तर दिलं. "पाच सहा टकली गेली तिकडं. गोमूत्र शिंपडले आणि शुद्धीकरण केले. हे काय कर्तुत्व आहे का. तसेच आता सगळ्या लालबागमध्ये गोमूत्र शिंपडणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. "तसेच आधी मनाचे शुद्धीकरण कर  किंवा जे शिंपडले ते जरासे घे, असा घणाघातही राणेंनी केला.


ठाकरे नावाचे एकतरी हॉस्पिटल किंवा शाळा काढली का? 


"ठाकरे नावाचे एकतरी हॉस्पिटल, शाळा काढली का तुम्ही", असा प्रश्न त्यांनी जनतेला संबोधित करताना उपस्थित केला. आम्ही वाचलो ही आई वडिलांची पुण्याई. राणे येवून गेलो तिथं म्हणजे मातोश्रीवर आणि मंत्रालयातही शिंपड गोमूत्र", असंही राणे म्हणाले.