Narayan Rane : सावधान ! जूनमध्ये भारतात आर्थिक मंदी येणार? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा इशारा
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याने भारताचं टेंशन वाढलं, वाढती महागाई, व्याजदर आणि जागतिक अस्थिरतेचा सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार
Economic Recession In India : भारतात जूननंतर आर्थिक मंदीचं सावट येऊ शकतं असं मोठं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलंय. जगामध्ये सर्वच मोठे देशांना आर्थिक मंदीची झळ बसलीय. भारतालाही आर्थिक मंदीची झळ बसू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रयत्न करत आहेत. आर्थिक मंदी भारतात येणार नाही मात्र आलीच तर जूननंतर अपेक्षित आहे असं विधान नारायण राणेंनी केलंय. सध्या सारं जग आर्थिक मंदीच्या (Economic recession) विळख्यात सापडलंय. मंदीचा तडाखा भारतालाही बसू शकतो. मंदी रोखण्यासाठी केंद्र सरकार पुरेपुर प्रयत्न करत असल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
भारताचं टेन्शन वाढलं
भारतात जूननंतर आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली राणेंच्या वक्तव्यामुळे भारताचं टेंशन वाढलं आहे. मात्र, नागरिकांना आणि पर्यायाने देशाला मंदीची झळ पोहोचू नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नियोजन केलं जात आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. एकीकडे राणेंनी मंदीचे संकेत दिले आहेत तर दुसरीकडे जागतिक नाणेनिधीच्या अहवालानं (International Monetary Fund Report) सर्वांची झोप उडवलीय.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संशोधन विभागानं दिलेल्या अहवालानुसार वाढती महागाई (Inflation), व्याजदर (Interest Rate) आणि जागतिक अस्थिरतेचा सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. अर्थव्यवस्था इतकी ढासळेल की तीन व्यक्तींमागे एकाची नोकरी जाईल असा इशाराही या अहवालात देण्यात आलाय. 2023 या वर्षात जगभरातील कोट्यवधी लोक बेरोजगार (Unemployed)होण्याची भीती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केलीय.
विशेष म्हणजे मागच्या महिन्यापासूनच जगभरात नोकरकपातीची लाट आलीय. फेसबुक, ट्विटरपाठोपाठ अॅमेझॉनसारख्या बड्या कंपन्यांनी शेकडो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय.
जगात नोकरकपातीची लाट
त्यामुळे आपली नोकरी जाऊ नये असं वाटत असेल तर काळजी घ्या, अनावश्यक खर्च टाळा, पैशांची बचत करा. नोकरीसोबत शाश्वत उद्योगांचीही कास धरा.