मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूचा विळखा आणि सुरु असणारं देशव्यापी लॉकडाऊन या सर्व परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीय मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केली. असं असलं तरीही, त्यांच्या या मागणीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र त्यांचं वेगळं मत मांडलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी 'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी या मुद्द्यावर आपलं मत सर्वांपुढे ठेवत वास्तवदर्शी परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. परप्रांतीय त्यांच्या मुळ गावी परतल्यानंतर त्यांच्या हाताशी रोजगार कुठे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. परप्रांतीयांना गावाकडे पाठवून उपयोग नाही. उलटपक्षी इथेच थांबवून हळूहळू त्यांच्या हाती उद्योग देण्याचा विचार त्यांनी मांडला. 


महाराष्ट्रात अडकललेल्या जवळपास ६ लाख परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी परत पाठवण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष ट्रेन सोडावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. ज्यावर आपली भूमिका मांडत गडकरी म्हणाले, 'मी त्यांचा विरोध करत नाही. पण, ही मंडळी गावात गेली तर त्यांना रोजगार आहे कुठे. या मंडळींना त्या ठिकाणी रोजगार न मिळाल्यामुळेच ते मुंबई आणि पुण्यामध्ये आले आहेत. त्यामुळे आता त्यांना रोजगार मिळणं हा मुद्दा महत्त्वाचा आहे', असं गडकरी म्हणाले. 


गावाकडे गेल्यावर या मंडळींकडे राहण्यास घर असेल. पण, त्यांना रोजगाराअभावी खायला काय मिळणार? असा प्रश्न त्यांनी अधोरेखित केला. मजुरांना गावी पाठवण्यापेक्षा इथे हळूहळू कामं सुरु करणं आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला गेला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं. 



मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग अशी अनेक कामं आता सुरु होतील. त्यामुळे यातील बऱ्याच मजुरांना काम मिळालं, आणि कारखान्यांच्या मालकांनी, उद्योजकांनी या मजुरांच्या राहण्याच्या खाण्याच्या गरजांबवर जबाबदारी ने लक्ष देत कोरोनाच्या दृष्टीने आखलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाही अंमलात आणण्यावर भर द्यावा असा सल्ला दिला.