केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोरोना पॉझिटिव्ह
सगळ्यांना काळजी घेण्याचं केलं आवाहन
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात येणार आहे. संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे रामदास आठवले यांचे आवाहन केले आहे. आज सकाळी रामदास आठवले यांनी कोरोनाची चाचणी केली होती कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
सोमवारी रामदास आठवलेंच्या आरपीआयमध्ये पायल घोषने प्रवेश केला आहे. यावेळी रामदास आठवले अनेकांच्या संपर्कात आले. पायल घोष देखील आता क्वारंटाईन आहे. पायल घोषने फिल्ममेकर अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. सोमवारी पायल घोष आरपीआयची सदस्य झाली. पक्षाने पायलला 'व्ह्युमन विंग'ची वाइस प्रेसीडेंट घोषित झाली आहे.
रामदास आठवलेंना सौम्य लक्षणं असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या कार्यक्रमात जे उपस्थित होते, त्यांनी देखील सतर्क राहण्याचं आवाहन रिपाइंकडून करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
दरम्यान, ‘रामदास आठवले यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत. कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी काळजी करू नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार मुंबईत एका खाजगी रुग्णालयात चार दिवसांसाठी ते दाखल होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे आणि शासकीय बैठकांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत’, असं रिपाइंने जारी केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे.