मुंबई : 1 मेपासून केंद्र सरकारने (Central Government) 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण (Vaccination) सुरू करण्याचं जाहीर केलंय. सध्या 45 वर्षावरील व्यक्तींसाठी लसीकरण सुरु असताना पालिकेला पुरेसे डोस मिळत नाहीयत. त्यामुळे सद्यस्थितीत सर्व 73 खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद होण्याच्या मार्गावर आहे. पुरसे डोस नसल्यामुळे सध्या केवळ पालिका आणि सरकारच्या लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना डोस दिले जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सद्यस्थितीत पुरेसे डोस येत नसल्याने खासगी केंद्रांना डोस उपलब्ध करून देणे पालिकेला मुश्कील बनले आहे. त्यामुळे केंद्राने आवश्यक त्या प्रमाणात डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर य़ांनी केली आहे.


प्रवासावर निर्बंध 



लोकलबरोबरच मेट्रो आणि मोनो रेल्वे प्रवासावरही निर्बंध आणले गेले आहेत. सर्वसामान्यांसाठी या सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. शासकीय कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी तसंच उपचारांची गरज असलेल्यांनाच  सार्वजनिक प्रवासाची मुभा असेल. 


शासकीय कर्मचाऱ्यांना अधिकृत ओळखपत्र दाखवल्यानंतरच तिकीट किंवा पास मिळणार आहे. रुग्णासोबत एकालाच प्रवासाची मुभा सरकारी कर्मचाऱयांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.


रेल्वे स्थानकांत विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांमध्ये पहिल्यांदाच घट नोंदवण्यात आलीय. कोरोना रुग्णवाढ नियंत्रणासाठी हे शुभ संकेत आहेत.
गेल्या चार दिवसांत मध्य रेल्वेवर सरासरी 30 हून कमी प्रवासी विनामास्क प्रवास करत असल्याचे आढळले. विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांवर 500 रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार रेल्वे मंडळाने दिले आहेत. सध्या महापालिका मार्शल आणि तिकीट तपासणीस या दोन्ही यंत्रणा विनामास्क प्रवाशांवर कारवाई करत आहेत.


भारतात रुग्णसंख्या वाढली 


भारतात कोरोनाचा कहर वाढतच चाललाय. गेल्या 24 तासांत 3 लाख 14 हजार 835 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. देशात पहिल्यांदाच 3 लाखांहून अधिक रुग्ण आढळून आलेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातली सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. कुठल्याही देशात एका दिवसात एवढी रुग्णसंख्या नोंद झालेली नाही. गेल्या 24 तासांत 2104 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. यावर्षी 8 जानेवारीला अमेरिकेत 3 लाख 7 हजार रुग्ण एका दिवसांत आढळून आले होते. आता भारतात आज सर्वाधिक 3 लाख 14 हजार 835 रुग्ण एकाच दिवसांत आढळून आलेत.