`लतादीदींनी आंबडेकरी गाणी गायली नाहीत`, यावर प्रकाश आंबेडकर यांचं सर्वांना फटकारणारं उत्तर
भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर समाज माध्यमांवर त्यांच्या विरोधातला सूर पाहायला मिळाला.
मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर समाज माध्यमांवर त्यांच्या विरोधातला सूर पाहायला मिळाला. लता दीदींनी त्यांच्या 6 पेक्षा अधिक दशकांच्या कारकिर्दीत भीम गीतं किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गीतं गायली नाहीत, असा सूर नेटकऱ्यांकडून आवळण्यात आला. दरम्यान या सर्व प्रकरणी, लता दीदींनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर गाणी गायली नाहीत, असा प्रश्न बाबासाहेबांचे नातू आणि वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारला. यावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. (vba chief prakash ambedkar commented on why not lata mangheskar sing song on dr babasaheb ambedkar)
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
"लता मंगेशकर यांनी कुणाचीही गाणी गायली नाहीत. त्यांनी पंडित नेहरुंवरचंही गाणं गायलं नाही, सरदार पटेल यांच्यावरचीही गाणी त्यांनी गायली नाहीत. काही माणसांची तत्व असतात, त्याचा आपण सन्मान राखायला हवा" असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ट्रोलिंगबाबत काय म्हणाले?
सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यानुसार, लता दीदींनी आंबेडकरांवर गाणी गायली नाहीत, म्हणून त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर ट्रोल करण्यात आलं. यावरुनही प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली.
"हा प्रकार चूकीचा आहे. तुम्हाला बोलायचं होतं काही करायचं होतं तर, त्या जिवंत असताना करायला हवं होतं. एकदा माणूस गेला की त्याचा आदरच व्हायला हवा", असं आंबेडकर म्हणाले.