मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षपदावरून अजूनही गोंधळात गोंधळ सुरूच आहे. उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलाय. तर विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडं आलंय. विधानसभा अध्यक्षाच्या नावावर दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद न घेता विधानसभा अध्यक्षपद घ्यावे, अशी काँग्रेसच्या नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यावरच पत्रकारांनी अजित दादांना उपमुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला होता.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा अध्यक्षपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद देण्याची काँग्रेसची मागणी असल्याचं पुढं आलं होतं. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उपमुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचं, याच्यावरून अंतर्गत वाद सुरूच आहेत. त्यातच काँग्रेसनं उपमुख्यमंत्री पदावर दावा केल्यानं या वादात भरच पडलीय.  



दरम्यान, उद्या अर्थात शनिवारी उद्धव ठाकरे सरकारचा विश्वासदर्शक ठराव पार पडणार आहे. राज्यपालांकडून ठाकरे सरकारला बहुमत चाचणीसाठी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांचा शपथविधी पार पडलाय. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अद्याप बाकी आहे.