दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही राज्यात मोठी खिंडार पडण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीचे अनेक आमदार सध्या भाजपा आणि शिवसेनेच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेकांनी भाजपात प्रवेश केला होता. त्याचीच पुनरावृत्ती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पहायला मिळते आहे. काँग्रेस पाठोपाठ लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसलाही राज्यात मोठी खिंडार पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विजयसिंह मोहिते पाटील घराणे भाजपात गेल्यानंतर सोलापूरातील राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्या माध्यमातून भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.


यात माढाचे आमदार बबनदादा शिंदे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या नावाची चर्चा आहे. तर नगरचे आमदार संग्राम जगतापही भाजपाच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. कोकणातील श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. भाजपा २२० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा दावा करतात, मग त्यांना दुसऱ्या पक्षातील आमदार का फोडावे लागतात?, असा सवाल याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केलाय. आमच्याही संपर्कात भाजपा, शिवसेनेचे नेते असल्याचा दावाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत बोलताना केलाय.


लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खचलेल्या विरोधी पक्षातील आमदार आपल्या राजकीय भवितव्यासाठी सत्ताधारी पक्षाची वाट धरत आहेत. विरोधी पक्षात राहिलो तर आपण निवडून येणार नाही, याची भीती काही आमदारांना वाटत आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादीमधून यापूर्वी सत्ताधारी पक्षात गेलेल्या नेत्यांच्या माध्यमातून हे आमदार भाजपा आणि शिवसेनेच्या संपर्कात आहेत.


जयदत्त क्षीरसागर आणि पांडुरंग बरोरा यांनी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. तर आणखी काही आमदार लवकरच भाजपा-शिवसेनेत प्रवेश करतील. लोकसभा निवडणुकीत पराभवामुळे खचलेल्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा फटका असू शकतो.