`आधी स्वत:चा रेकॉर्ड बघा` विद्या चव्हाण यांची चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका
एखादा पुरुष स्त्री भेटली तर याची बातमी करणे आणि ट्विट करणे चुकीचं आहे, असेही विद्या चव्हाण म्हणाल्या
सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या सत्तातरानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडीतील नेते एकमेकांविरुद्ध आरोप करताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये भाजप (Bjp) नेतेही विरोधकांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन सध्या राजकारण सुरु आहे. भाजप महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी हा व्हिडीओ ट्विट करत नाना पटोलेंनी यावर उत्तर द्यावं असं म्हटलं आहे. त्यामुळे आता चित्रा वाघ यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण यांनीही चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. गेले काही दिवस चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता पुन्हा हा वाद उफाळून आला आहे. चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाणांवर टीका करत पुन्हा नादी लागू नका माझ्या तोंडावर आपटाल, असा इशारा दिला होता.
त्यानंतर आता विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ यांनी लक्षात घ्यावं टाळी एका हाताने वाजत नाही. त्याचं आता राठोड यांच्या बाबत काय मत आहे हे सांगावं. महिलांनी भान ठेवायला हवं आपण कोणा बाबत काय बोलतो आहे, असे विद्या चव्हाण म्हणाल्या.
भाजप कडून काहीतरी मिळवण्यासाठी त्या आता चुकीची वक्तव्य करून काहीतरी पदरी पडून घेण्याचा प्रयत्न आहे. एखादी पुरुष स्त्री भेटली तर याची बातमी करणे आणि ट्विट करणे चुकीचं आहे. त्या कुणाला भेटत नाहीत का? असा सवाल विद्या चव्हाण यांनी केला.
त्यांचा काय रेकॉर्ड आहे हे देखील लक्षात घ्यावं. त्या धुतल्या तांदळा सारख्या स्वच्छ आहेत का हा देखील प्रश्न आहे. उगाचच छळवादी सासू म्हणुन बदनामी करू नये. जर तस असेल तर त्यांनी कोर्टात जावं. आमच्याकडे सुद्धा काही आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं . मात्र अजूनही आम्ही गप्प अहोत. त्यांना यानिमित्ताने केवळ मी आठवण करून देत आहेत, असा इशारा विद्या चव्हाण यांनी दिला आहे.