दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षामधला डेडलॉक १४ व्या दिवशीही कायम आहे. काँग्रेसच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनीही भाजपा सरकार येऊ नये, असं बहुतांश काँग्रेस आमदारांचं मत असल्याचं स्पष्ट केलं.  याच पार्श्वभूमीवर, काँग्रेस आमदारांची मतं जाणून घेण्यासाठी मल्लिकार्जून खरगे उद्या मुंबईत येत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते 'विरोधी पक्षात बसण्याची भूमिका' बोलून दाखवत असताना राज्यातील काँग्रेसचे नेते राज्यात बिगर भाजपा सरकार हवे, अशी भूमिका मांडत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी, राज्यातील काँग्रेस नेत्यांची एक बैठक मुंबईत पार पडली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीसाठी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख, विश्वजित कदम अशा वरच्या फळीतील नेते उपस्थित होते. यावेळी, 'काँग्रेसच्या ९० टक्के आमदारांना भाजपाचं सरकार नकोय, याबद्दल लवकरच पक्षश्रेष्ठींशी चर्चा करत आहोत' असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. 



दुसरीकडे, 'पर्यायांचा विचार करायचा असेल तर शिवसेनेनं आधी एनडीएमधून बाहेर पडावं' असा खोचक सल्ला वजा सूचना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलीय. 


तर सत्तास्थापनेबाबत शिवसेनेची ताठर भूमिका अद्याप कायम असल्याचं संजय राऊत यांच्या विधानांवरून स्पष्ट झालंय. अशोक चव्हाण यांच्या अनाहूत सल्ल्याबाबत बोलताना 'सेना युतीतून बाहेर पडणार का?' असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला गेला असता 'काँग्रेसचेही अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचं' राऊत यांनी प्रत्यूत्तर दिलं.