मुंबई: दक्षिण मुंबईत पुनर्विकासामुळं छोट्या रूमलाही येत असलेला कोट्यवधींचा भाव पाहून अनेकांची नियत फिरू लागलीय. यामुळं चाळींतल्या ग्रामस्थ मंडळांच्या रूमचे अस्तित्वच धोक्यात येवू लागलंय. अगोदरच गावचे राजकारण या खोल्यांमध्ये शिरले आहे. त्यात आता ही रूम ज्याच्या नावावर गावक-यांनी घेतली होती, त्यांच्या वारसांनी या रूम विकण्याचा घाट घातल्याने या गावच्या रूममध्ये राहणाऱ्या तरूणांमध्ये असंतोष पसरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील मलिग्रे ग्रामस्थ मंडळाची बीडीडी चाळीतील ही रूम. या 180 चौरस फुटांच्या रूममध्ये त्या गावातून नोकरीसाठी आलेली तब्बल 21 जण राहतात. 40-50 वर्षापूर्वी राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबईत नोकरीसाठी आलेल्यांना एकट्याने रूम घेणं शक्य नव्हते. त्यामुळे गावातील लोकांनी एकत्र येऊन मुंबईत अशा रूम घेतल्या आहेत.


परंतु तेव्हा कायदेशीर अडचणींमुळे आणि विश्वासानं एकाच व्यक्तीच्या नावावर रूम विकत घेतल्या गेल्या.  सभोवती सा-या कापड गिरण्या असल्यानं लोअर परेलमधील डिलाईल रोडवर गाववाल्यांच्या तब्बल साडेतीनशे रूम आहेत. तर मुंबई आणि परिसरात ही संख्या दोन हजारांवर जाते.


आतापर्यंत गावातून नोकरीसाठी मुंबईत आलेल्या प्रत्येक तरूणाला ओसरी पसरायला जागा या रूमने दिलीय. परंतु बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे वारे वाहू लागले आणि इथल्या घरांना कोटींचे भाव मिळू लागले. परिणामी ज्यांच्या नावावर या रूम आहेत, त्यांच्या वारसांनी त्या विकण्याचे मनसुबे आखलेत. परंतु याविरोधात इथं राहणारे तरूणही एकवटले आणि गावीही मोर्चे निघू लागलेत.